यंदा एकही नवीन कॉलेज नाही?

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई नव्या शैक्षणिक वर्षात नवीन अभ्यासक्रम तसेच नवीन कॉलेजांच्या मान्यतेचे प्रस्ताव ३१ मार्चपर्यंत विद्यापीठांना राज्य सरकारकडे सादर करावे लागतात. मात्र यंदा लॉकडाऊनमुळे हे प्रस्ताव सादर करणे अवघड झाले आहे. परिणामी यासाठी सरकारने कॉलेजांना मुदतवाढ द्यावी, अशी मागणी विद्यापीठांकडून होत आहे. सह दरवर्षी बिंदूनामावलीप्रमाणे विद्यापीठांकडे नवीन कॉलेजांचे प्रस्ताव येतात. या कॉलेजांमध्ये स्थानीय माहिती समिती (एलआयसी) पाठवण्यात येते. या समितीच्या अहवालानुसार विद्यापीठ कॉलेजांना परवानगी द्यायची की नाही, याबाबत निर्णय होतो. यानंतर तो प्रस्ताव राज्य शासनाला सादर होतो. कॉलेजांमध्ये नवा अभ्यासक्रम सुरू करायचा असल्यास त्यांचेही प्रस्ताव विद्यापीठांकडे येतात. यानुसार विद्यापीठ विद्वत परिषद याबाबतचे प्रस्ताव सादर करून त्याची मान्यता घेते. महाराष्ट्र विद्यापीठ कायदा, २०१६नुसार विद्यापीठ स्तरावरील ही सर्व प्रक्रिया ३१ मार्चपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असते. मात्र, यंदा करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. परिणामी विद्यापीठांमध्ये हे प्रस्ताव ऑनलाइन सादर होत असले तरी त्यावर पुढील कार्यवाही करण्यासाठी आवश्यक कर्मचारी उपलब्ध नाहीत. याचबरोबर समितीने ज्यांचे प्रस्ताव नाकारले आहेत, त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी देणेही या कालावधीत शक्य होणार नाही. यामुळे ही तारीख वाढवून द्यावी, अशी मागणी विद्यापीठांकडून शासनाकडे करण्यात येत आहे. मात्र याला शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे सुत्रांकडून समजते. यामुळे पुढील शैक्षणिक वर्षांत नवीन कॉलेजे तसेच नवीन अभ्यासक्रम सुरू होणे कठीण असेल, अशी चिन्हे आहेत. यामुळे शासनाने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा आणि सर्व विद्यापीठांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. मात्र, यासाठी शासनाला अध्यादेश काढण्याची गरज पडणार आहे. ३१ मार्चपर्यंत प्रस्ताव सादर करण्याची तरतूद कायद्यात आहे. कायद्यातील तरतुदीला या वर्षीची भीषण परिस्थिती लक्षात घेऊन एका वर्षापुरती बगल देता येऊ शकते. मात्र यासाठी शासनाने तातडीने पुढाकार घेऊन अद्यादेश जारी करावा व त्यानुसार योग्य ती कार्यवाही करावी, असे परिनियम समितीच्या सदस्यांचे म्हणणे आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/39Bs84e
via IFTTT

Post a Comment

0 Comments