लॉकडाऊनमध्ये जेएनयूची ऑनलाइन परीक्षा सुरू

जवाहरलाल नेहरू विद्यापीठ अर्थात जेएनयूने मिड सेमिस्टर परीक्षा ऑनलाईन सुरू केली आहे. जेएनयूचे कुलगुरू प्रा. जगदीश कुमार यांनी सांगितले की, 'जेएनयूच्या स्कूल ऑफ एन्व्हायर्नमेंटल सायन्सेजने एमएससी, एमफिल आणि पीएचडीच्या शैक्षणिक आवश्यकता पूर्ण करुन सोमवारपासून ऑनलाईन परीक्षा सुरू केल्या आहेत. ही परीक्षा ४ मे पर्यंत चालणार आहे.' पुढील ऑनलाइन परीक्षांकडेही त्यांनी लक्ष वेधले. गेल्या आठवड्यातच जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने सेमिस्टर परीक्षा ऑनलाइन घेण्यासाठी विद्यापीठाच्या विद्वत परिषदेच्या (अकॅडमिक काउन्सिल) बैठकीत मान्यता दिली आहे. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार सेमिस्टर परीक्षेसंदर्भात संस्थांचे डीन आणि विशेष केंद्राच्या अध्यक्षांच्या शिफारशींना परिषदेने मान्यता दिली आहे. असेही म्हटले गेले होते की शैक्षणिक सत्र आणि नवीन शैक्षणिक सत्र सुरू करणं आणि पूर्ण करण्याच्या शिफारशींना मंजूर करण्याचे अधिकार कुलगुरूंकडे आहेत. मात्र, जेएनयू शिक्षक संघटनेकडून याचा विरोध केला जात आहे. करोना व्हायरस साथीच्या आजारामुळे आणि लॉकडाऊन स्थितीमुळे विद्यापीठाचे शैक्षणिक सत्र सध्या बंदच राहणार आहे. देशभरात लॉकडाऊनमुळे १६ मार्चपासून सर्व शाळा, कॉलेजांचे वर्ग बंद आहेत. बहुतेक महाविद्यालये आणि विद्यापीठे ऑनलाइन वर्ग घेत आहेत. शिक्षकांना ऑनलाइन शिक्षण प्रक्रियेत प्रशिक्षण देण्यासाठी विद्यापीठात डिजिटल कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यापूर्वी एक अहवाल कुलगुरूंना सादर करण्यात आला होता ज्यामध्ये उन्हाळ्याची सुट्टी रद्द करावी अशी शिफारस करण्यात आली होती. इंटरनेट कनेक्शनअभावी ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार नाही अशा विद्यार्थ्यांना त्यांची असाइनमेंट सादर करण्यासाठी वाढीव कालावधी देण्यात येईल, अशी सूचनाही यात करण्यात आली आहे. परंतु याबद्दल अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2zvmjJg
via IFTTT

Post a Comment

0 Comments