शाळा बंद; तरीही निकालाचे आदेश

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचे मूल्यमापन करून तातडीने त्यांचे जाहीर करण्याची सूचना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने राज्यातील सर्व शाळा आणि ज्युनिअर कॉलेजांना केली आहे. परंतु, घटक चाचणी तसेच सहामाही निकालाची कागदपत्रे शाळेतच असून दीड महिन्यापासून असलेल्या लॉकडाउनमुळे शाळेत जाणे शिक्षकांना शक्य झालेले नाही. त्यामुळे निकाल कसे जाहीर करायचे, असा प्रश्न शिक्षक संघटनांकडून उपस्थित करण्यात येत आहे. करोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाउनमुळे राज्यभरातील शाळा व कॉलेजे बंद ठेवण्यात आली आहेत. लॉकडाउनमुळे पहिली ते आठवीची परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचे, तसेच नववी आणि अकरावीची परीक्षाही रद्द करत त्यांचे शैक्षणिक वर्षाचे मूल्यमापन करून निकाल जाहीर करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले होते. त्यानुसार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने राज्यातील सर्व शाळा आणि ज्युनिअर कॉलेजांना शैक्षणिक वर्ष २०१९-२० चा निकाल दूरध्वनी, एसएमएस किंवा अन्य ऑनलाइन पद्धतीने तातडीने कळवावा, असे सांगितले आहे. निकाल जाहीर केल्याने विद्यार्थ्यांत कोणत्याही प्रकारचा संभ्रम राहणार नाही, तसेच त्यांना पुढील शिक्षणी वर्षांचा अभ्यास उपलब्ध साहित्यांच्या आधारे करणे शक्य होईल, असे परिषदेचे म्हणणे आहे. लॉकडाउनच्या परिस्थितीनुसार विद्यार्थ्यांना निकालपत्र देण्याची आवश्यक कार्यवाही करावी, अशीही सूचना परिषदेने परिपत्रकाद्वारे केली आहे. परिषदेच्या या परिपत्रकामुळे शिक्षकांमध्ये खळबळ माजली आहे. विद्यार्थ्यांच्या निकालांची कागदपत्रे, तसेच इतर सर्व तपशील शाळांमध्ये आहे. लॉकडाउनमुळे आम्हाला शाळेत जाणे शक्य नाही. शाळेत जाण्यासाठी शिक्षण विभागाकडून कोणतीही सुविधा नाही. घरातून बाहेर पडल्यावर पोलिसांकडून चोप देण्यात येत आहे, असे असताना आम्ही शाळेत कसे पोहोचायचे आणि निकाल कसा जाहीर करायचा, असा प्रश्न शिक्षकांकडून विचारण्यात येत आहे. शिक्षकांच्या उन्हाळी सुट्टीबाबतही सरकारने विचार करावा अशी मागणी शिक्षक संघटनांकडून करण्यात आली. -- विद्यार्थ्यांचे दूरध्वनी क्रमांक, प्रथम सत्राचा निकाल, माहितीपुस्तिका शाळांमध्ये आहे. लॉकडाउनमुळे वाहने उपलब्ध नसल्याने शाळेत कसे जायचे, हा प्रश्न आहे. नवीन शैक्षणिक वर्ष कधी सुरू होणार याबाबत विभागाकडून स्पष्टता नाही. - राजेश पंड्या, उपाध्यक्ष, टीचर्स डेमोक्रेटिक फ्रंट -- वर्षभरातील घटक चाचणी, सहामाही निकालाची कागदपत्रे शाळेतच आहेत. रेडझोन असल्याने मुंबईतील शाळांमधील शिक्षकांना शाळेत पोहोचता येत नाही. अनेक शिक्षकांचे दहावी बोर्डाचे पेपरही शाळेतच आहेत. ते तपासून नियमकांकडे कसे पाठवावे याबाबतचा निर्णय अजूनही बोर्डाने घेतलेला नसल्याने दहावीचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. शाळा व शिक्षकांपुढील अडचणी पाहता निकालपत्र देण्याबाबत घाई करू नये. - अनिल बोरनारे, संयोजक, भाजप शिक्षक आघाडी मुंबई-कोकण विभाग -- शाळांना लॉकडाउनमधून कोणतीही सूट नाही. सर्व रेकार्ड शाळांमध्ये आहे. मग निकाल कसा तयार करायचा? शिवाय शिक्षकांना उन्हाळी सुट्टी आहे की नाही, याबाबत स्पष्टता नाही. दहावी व बारावीच्या उत्तरपत्रिका शाळेत तपासणीकरिता पडून आहेत. लॉकडाउनमधून काही शिक्षकांना वगळा, असे आम्ही आधीपासूनच सांगत होतो. पण त्यावर मार्ग काढला नाही. आता रेकार्ड आणायला घराबाहेर काढून पोलिसांकडून बदडायला शिक्षकांना सोडायचे का? - प्रशांत रेडीज, सचिव, मुंबई मुख्याध्यापक संघटना


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2WlniDR
via IFTTT

Post a Comment

0 Comments