५६ टक्के विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन नाहीत: सर्वेक्षण

नवी दिल्ली: सुमारे ५६ टक्के मुलांकडे ऑनलाइन शिक्षणासाठी आवश्यक असलेले स्मार्टफोन नाहीत अशी माहिती एक सर्वेक्षणातून पुढे आली आहे. करोनाच्या संक्रमणामुळे देशातील सर्व शैक्षणिक संस्था बंद आहेत. शाळा, कॉलेजांचं शिक्षण ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे. या पार्श्वभूमीवर स्माइल फाउंडेशन या संस्थेने हे सर्वेक्षण केले. यात शालेय स्तरावरील सुमारे ४२,८३१ विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. कोविड - १९ च्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष स्थिती आणि उपाय असं या अभ्यासाचं नाव आहे. या सर्वेक्षणातून असं समोर आलं की ४३.९९ टक्के मुलांकडे स्मार्टफोन आहेत आणि अन्य ४३.९९ टक्के मुलांकडे बेसिक फोन आहेत तर १२.०२ टक्के मुलांकडे बेसिक किंवा स्मार्टफोन काहीही नाही. म्हणजेच एकूण ५६.०१ टक्के विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन नसल्याचं या सर्वेक्षणातून पुढे आलं आहे. विद्यार्थ्यांकडे टेलिव्हिजन संच आहेत का हेही पडताळून पाहण्यात आलं. ६८.९९ टक्के मुलांच्या घरी टीव्ही आहेत, ३१.०१ टक्के मुलांच्या घरी टीव्ही नाहीत, असं हे सर्वेक्षण सांगतं. प्राथमिक इयत्तांमधील (इयत्ता पहिली ते पाचवी) १९,५७६ विद्यार्थ्यांचं तर उच्च प्राथमिक मधील (सहावी ते आठवी) १२,२७७ विद्यार्थ्यांचं सर्वेक्षण करण्यात आलं. माध्यमिक स्तरावरील (नववी आणि दहावी) ५,५३७ विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले, तर उच्च माध्यमिक स्तरावर (अकरावी, बारावी) ३,२१६ विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. २३ राज्यांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. यात महाराष्ट्रासह, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, प. बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगणा, उत्तर प्रदेश, हरयाणा आदी राज्यांचा समावेश होता. १६ एप्रिल ते २८ एप्रिल या कालावधीत हे सर्वेक्षण करण्यात आले. मार्च महिन्यात देशभर पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आली. त्यामुळे आता नव्या शैक्षणिक वर्षात शाळा, महाविद्यालये ऑनलाइन अभ्यास घेत आहेत. या पार्श्वभूमीवर हे सर्वेक्षण करण्यात आले. अधिकृत आकडेवारीनुसार देशात ३५ कोटी विद्यार्थी आहेत. यापैकी किती जणांना डिजीटल डिव्हाइसेस आणि इंटरनेटचा अॅक्सेस आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. स्माइल फाउंडेशनचे कार्यकारी विश्वस्त आणि सहसंस्थापक शंतनु मिश्रा म्हणाले, 'या सर्वेक्षणातून देशातील डिजीटल दरी हे एक मोठं आव्हान असल्याचं लक्षात येतं.'


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3fmjZEk
via IFTTT

Post a Comment

0 Comments