२४ कि.मी. सायकल प्रवास करून शाळा गाठणाऱ्या रोशनीला ९८ टक्के!

मध्य प्रदेशातील एका लहानशा खेड्यात राहणाऱ्या रोशनी भदौरिया या मुलीचं सर्वत्र कौतुक होत आहे. दररोज तब्बल २४ कि.मी. चा प्रवास सायकलने करत तिला शाळा गाठावी लागायची. पण तिचा उत्साह कधीच मावळला नाही. जी मेहनत शाळेत जाण्यासाठी करावी लागायची तेवढीच तिने अभ्यासातही केली. दहावीत तिला तब्बल ९८.७५ टक्के गुण मिळाले. रोशनीचे वडील शेतकरी आहेत. मध्य प्रदेशातील चंबळच्या भिंड येथील अजनोल गावात हे कुटुंब राहतं. मुलीच्या यशाने तिचे वडीलही भारावून गेले आहेत. आपल्याला मुलीचा अभिमान असल्याचं ते सांगतात. यापुढे तिला कॉलेजसाठी सायकल नव्हे तर एखाद्या वाहनाची व्यवस्था करणार असं ते सांगतात. मध्य प्रदेश बोर्डाचा दहावीचा निकाल शनिवारी लागला आणि रोशनीची कहाणी पुढे आली. रोशनीच्या वडिलांनी पीटीआयला सांगितले, 'आठवीपर्यंत रोशनी वेगळ्या शाळेत होती, तेथे बसची सोय होती. पण नंतर तिला मेहगांवच्या एका सरकारी शाळेत घातलं, ही शाळा अजनोलपासून १२ कि.मी. दूर आहे. शिवाय तेथे जाण्यासाठी कुठली वाहनाची सुविधाही नाही.' रोशनीचे आणखी दोन भाऊ आहेत. त्यांच्या गावात आजतागायत कुणाला दहावीत इतके टक्के मिळालेले नाहीत. रोशनीला सिव्हिल सर्व्हिस परीक्षा देऊन आयएएस व्हायचे आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/38zwZEb
via IFTTT

Post a Comment

0 Comments