Also visit www.atgnews.com
विद्यार्थ्यांना पदवी परीक्षा घरबसल्या देता येणार; उच्च शिक्षणमंत्र्यांची ग्वाही
Final Year Exam 2020: पदवीच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्र परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना संपूर्ण सप्टेंबर महिना दिला जाईल आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून विविध विद्यापीठे विविध तारखांना परीक्षा घ्यायला सुरूवात करतील, असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. शिवाय संपूर्ण परीक्षा ही कमी कालावधीची असेल. विद्यार्थ्यांना फार त्रास न होता, शक्यतो घराबाहेर न पडता, परीक्षा केंद्रापर्यंत न जाता परीक्षा देता यावी याबाबत सर्व कुलगुरूंचे एकमत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरबसल्या परीक्षा देता यावी, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे सामंत म्हणाले. परीक्षांच्या तारखा काय, स्वरुप काय याबाबतची घोषणा येत्या दोन-तीन दिवसांत करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील अनेक विद्यापीठांनी परीक्षा घेण्यासाठी मुदतवाढीची मागणी केली आहे. त्यामुळे आम्ही २ सप्टेंबर रोजी आपत्कालीन व्यवस्थापन समितीची बैठक घेऊन विद्यापीठ अनुदान आयोगाकडे तशी विनंती करणार आहोत, अशी माहिती सामंत यांनी दिली. अंतिम वर्षाच्या परीक्षासंबंधी विविध विषयांबाबत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली सहा जणांची समिती गठीत करण्यात आली आहे. सोमवारी या समितीची बैठक पार पडली. त्यानंतर सामंत पत्रकार परिषदेत बोलत होते. समिती २ सप्टेंबर रोजी पुन्हा एकवार बैठक घेऊन सायंकाळी ४ वाजेपर्यंत दुसरा प्रस्ताव राज्य शासनाला सादर करणार आहेत. एकूण ७ लाख ९२ हजार ३८५ विद्यार्थ्यांची परीक्षा विद्यापीठांना घ्यायची आहे. मुंबई विद्यापीठ, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, सोलापूर, नागपूर तसेच एसएनडीटी विद्यापीठाने ३१ ऑक्टोबरपर्यंत तर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आणि अमरावती विद्यापीठाने १० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढीची मागणी केली आहे. तर यासंदर्भात २ सप्टेंबर रोजी आपत्कालीन व्यवस्थापनाची बैठक घेऊन त्यानंतर यूजीसीकडे आम्ही मुदतवाढीची मागणी करणार आहोत, असे सामंत म्हणाले. 'परीक्षा चांगल्या पद्धतीने, चांगल्या वातावरणात घेण्याचा प्रयत्न केला जाईल. शक्यतो, विद्यार्थ्यांना घरातल्या घरात बसून परीक्षा कशा प्रकारे देता येईल हे प्राधान्याने पाहिले जाईल,' अशी माहितीही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2QGx1Sw
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments