राज्य सरकार पदवी परीक्षा कधी, कशा घेणार? शिक्षणमंत्री सांगणार

Final Year Exam 2020: सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी पदवी परीक्षा घेण्यास विद्यापीठ अनुदान आयोगाला हिरवा कंदिल दाखवला. राज्य सरकारांना विद्यापीठ परीक्षा आयोजित करणे क्रमप्राप्त आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा न देता प्रमोट करता येणार नाही, असा स्पष्ट निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यामुळे महाराष्ट्र सरकार आता परीक्षांबाबत काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर शुक्रवारी दुपारी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषद होणार आहे. त्यामुळे ते काय सांगतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे. एस.एन.डी.टी,महिला विद्यपीठ,चर्चगेट येथे आज दुपारी १ वाजता सामंत यांची पत्रकार परिषद होणार आहे. यात ते राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षांच्या अनुषंगाने घोषणा करण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या भूमिकेवरही ते भाष्य करतील. ज्या राज्यांना कोविड-१९ संसर्गामुळे परीक्षा आयोजित करणे शक्य नाही, त्यांनी यूजीसीला कळवावे, असे सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना स्पष्ट केले आहे. मात्र राज्य सरकारने यापूर्वीच राज्यातील कोविड स्थितीची सविस्तर माहिती विद्यापीठ अनुदान आयोगाला पत्रव्यवहार करून कळवली होती. त्यामुळे या सर्व मुद्द्यांच्या अनुषंगाने उदय सामंत काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे. सर्वोच्च न्यायालय नेमके काय म्हणाले? राज्य परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पदवी बहाल करू शकत नाहीत, असा महत्त्वपूर्ण निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला. देशातील लाखो विद्यार्थी-पालकांचे डोळे ज्या निकालाकडे लागले आहेत, तो पदवी परीक्षांसंदर्भातील निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. विद्यापीठांच्या अंतिम सत्र परीक्षा होणार. ज्या राज्यांना वाटत आहे की त्यांना परीक्षा घेणे शक्य नाही, त्या राज्यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे जावे. परंतु राज्य अंतिम सत्र परीक्षा घेतल्याशिवाय पदवीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करू शकत नाहीत, असा निकाल देत विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3gGebFD
via IFTTT

Post a Comment

0 Comments