MHT-CET 2020 सप्टेंबरनंतरच होणार?

MHT CET 2020: 'राज्यात व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा (सीईटी) तालुकास्तरावर घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तज्ज्ञ समितीचा अहवाल आला की, सीईटी घेण्याबाबत निर्णय जाहीर करण्यात येईल,' अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी दिली. शैक्षणिक कागदपत्रे उपलब्ध नसल्याच्या कारणावरून एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही, असे आश्वासन सामंत यांनी दिले. दरम्यान, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात केंद्रीय पातळीवरील जेईई आणि नीट परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे या परीक्षा पार पडल्यानंतर राज्यातील प्रवेश परीक्षा पार पडण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. यंदा एमएचटी सीईटीसाठी ५ लाख ३२ हजार ३६१ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेशिवाय पदवी देता येणार नाही, असा निर्णय दिल्यानंतर राज्य सरकारने परीक्षा घेण्याच्या दृष्टीने सुरुवात केली आहे. त्यानुसार राज्यातील विद्यार्थी-पालकांमध्ये सीईटीबाबत उत्सुकता निर्माण झाली असून, सीईटी कधी होणार याकडे आता लक्ष लागले आहे. राज्यात इंजिनीअरिंग, फार्मसी, लॉ, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, बीएड अशा अनेक अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा होणे बाकी असून, त्यासाठी सात लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी परीक्षेची वाट पाहत आहे. याबाबत सामंत म्हणाले की, करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, जिल्हास्तरावर; तसेच तालुकास्तरावर सीईटी परीक्षा घेण्याबाबत उच्चशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. धनराज माने आणि तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ यांची समिती पडताळणी करीत आहे. त्यांनी तालुकास्तरावर सीईटी घेण्याबाबत चाचपणी सुरू केली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत, त्याचा अहवाल आल्यावर सीईटीबाबत घोषणा करता येईल, असेही सामंत यांनी स्पष्ट केले. अंतिम वर्षाच्या परीक्षा होत असतील, तर सीईटी परीक्षा घ्यायला काय हरकत आहे, अशी भूमिका काही पालकांनी मांडली आहे. 'कागदपत्रांसाठी मुदतवाढ' डिप्लोमाच्या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना अर्ज करताना, शैक्षणिक कागदपत्रे आणि दाखले जमा करण्यात अडचणी येत असतील, तर त्यांना मुदतवाढ मिळेल. शैक्षणिक कागदपत्रे नाहीत म्हणून राज्यात विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात येणार नाही, याची काळजी उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून घेण्यात येईल, अशी माहिती सामंत यांनी दिली. दरम्यान, डिप्लोमा प्रवेश प्रक्रियेला; तसेच कागदपत्रे जमा करायला मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/31DC2Sr
via IFTTT

Post a Comment

0 Comments