परीक्षा होणारच, विद्यार्थ्यांना परीक्षेशिवाय पदवी देता येणार नाही: SC

पदवी परीक्षा नको म्हणणाऱ्या विद्यार्थी-पालकांना सर्वोच्च न्यायालयात दिलासा मिळालेला नाही. राज्य परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पदवी बहाल करू शकत नाहीत, असा महत्त्वपूर्ण निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला. देशातील लाखो विद्यार्थी-पालकांचे डोळे ज्या निकालाकडे लागले आहेत, तो पदवी परीक्षांसंदर्भातील निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. विद्यापीठांच्या अंतिम सत्र परीक्षा होणार. ज्या राज्यांना वाटत आहे की त्यांना परीक्षा घेणे शक्य नाही, त्या राज्यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे जावे. परंतु राज्य अंतिम सत्र परीक्षा घेतल्याशिवाय पदवीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करू शकत नाहीत, असा निकाल देत विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्ष परीक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर १८ ऑगस्ट रोजी सुनावणी पूर्ण केली होती. या दरम्यान सर्व पक्षकारांचे म्हणणे ऐकून घेऊन सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. तो निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आज जाहीर केला. कोविड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर देशातील विद्यापीठांमधील अंतिम सत्र परीक्षांना विरोध करणाऱ्या याचिकांवर कोर्टाने आज अंतिम निर्णय दिला आहे. विद्यापीठांनी ३० सप्टेंबरपर्यंत परीक्षा घ्याव्यात असे निर्देश देणाऱ्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांना या याचिकांद्वारे सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. मागील सुनावणीत काय झाले होते? सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते की विद्यार्थ्यांच्या हिताचे काय आहे हे विद्यार्थी ठरवू शकत नाहीत, यासाठी वैधानिक संस्था आहेत. यूजीसीचे आदेश आणि निर्देशांमध्ये राज्य सरकार दखल देऊ शकते का यावरही मागील सुनावणीत खल झाला होता. शिवाय आपत्कालीन व्यवस्थापन कायद्याच्या अनुषंगानेही अनेक मुद्दे पक्षकारांनी मांडले होते. मंगळवारी, १८ ऑगस्ट रोजी सर्व सुनावणी पूर्ण करून सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. महाराष्ट्र सरकार तसेच युवा सेनेनेही न्यायालयासमोर विद्यार्थ्यांची बाजू मांडली आहे. महाराष्ट्रासह दिल्ली, प. बंगाल, ओडिशा, दिल्ली, पंजाब आदी राज्यांनी कोविड स्थितीत परीक्षा घेणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत धोका पत्करणे आहे असे न्यायालयाला सांगितले तसेच कोविड स्थितीमुळे अनेक महाविद्यालये, विद्यापीठांच्या इमारतींचे रुपांतर क्वारंटाइन सेंटरमध्ये केले असल्याने कोविड काळात परीक्षा घेण्यास असमर्थता व्यक्त केली होती.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3lqsgLb
via IFTTT

Post a Comment

0 Comments