जेईई अॅडव्हान्स्ड २०२०: परीक्षा केंद्रात जाण्यापूर्वी या सूचना लक्षात घ्या

JEE Advanced 2020: देशभरातील आयआयटींमधील अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा रविवारी २७ सप्टेंबर रोजी देशभरात होत आहे. सकाळी ९ ते १२ आणि दुपारी २.३० ते ५.३० अशा दोन सत्रांमध्ये ही परीक्षा होणार आहे. जे विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत, त्यांना कोविड-१९ प्रादुर्भावाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काही सूचनांचे काटेकोर पालन करणे अत्यावश्यक आहे. अॅडव्हान्स्ड परीक्षा देण्यासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांपैकी सुमारे ९८ टक्के विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचे परीक्षा केंद्र मिळाले आहे, असा आयआयटी दिल्लीचा दावा आहे. मास्क वापरणे, स्वत:चे हँडसॅनिटायझर सोबत पारदर्शक बाटलीत बाळगणे आणि त्याचा वापर करणे गरजेचे आहे. या गोष्टींशिवाय परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. विद्यार्थ्यांना जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर पोहोचवण्यासाठी आयआयटी अलुम्नायने एक पोर्टलही लाँच केले आहे. Eduride असे या पोर्टलचे नाव आहे, अशी माहितीही आयआयटी दिल्लीने दिली आहे. आरोग्यविषयक खबरदारी म्हणून कोणकोणत्या सूचनांचे विद्यार्थ्यांनी पालन करायचे आहे त्या पुढीलप्रमाणे :- - विद्यार्थ्यांनी त्यांचे स्वत:चे फेसमास्क वापरावेत आणि पारदर्शक बाटलीत सॅनिटायझर बाळगावे. पाण्याची बाटलीही पारदर्शक हवी. - दोन जणांमध्ये कायम किमान सहा फुटांचे अंतर हवे. यासाठी परीक्षा केंद्रांवर रांग लावण्यासाठी विशिष्ट व्यवस्था करण्यात येईल. तेथील कर्मचारी सांगतील त्या सूचनांचे विद्यार्थ्यांनी पालन करावे. - परीक्षा केंद्रात शिरताना विद्यार्थ्यांच्या अॅडमिट कार्डवरील बार कोड स्कॅन होईल. त्यानंतर त्यांनी परीक्षा हॉलचा क्रमांक दिला जाईल. - विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रात जाण्यापूर्वी हात सॅनिटाइज करणे गरजेचे आहे. - परीक्षेसाठी जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांकडे कोविड-१९ सेल्फ डिक्लेरेशन असणे गरजेचे आहे, अन्यथा परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. देशभरातील एकूण २२२ शहरांमध्ये ही परीक्षा आयोजित केली जाणार आहे. एकूण एक हजार परीक्षा केंद्रांवर परीक्षा होणार आहे. अधिकृत माहितीनुसार एकूण १ लाख ६० हजार ८३१ विद्यार्थ्यांनी यंदा जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेसाठी नोंदणी केली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/334oyzN
via IFTTT

Post a Comment

0 Comments