जेईई अॅडव्हान्स्ड: ९८ टक्के विद्यार्थ्यांना पसंतीचे परीक्षा केंद्र

JEE Advanced 2020: अॅडव्हान्स्ड परीक्षा देण्यासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांपैकी सुमारे ९८ टक्के विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचे परीक्षा केंद्र मिळाले आहे. जेईई अॅडव्हान्स्डच्या आयोजनाची जबाबदारी असलेल्या आयआयटी दिल्लीने हा दावा केला आहे. ही परीक्षा २७ सप्टेंबर २०२० रोजी होत आहे. देशभरातील एकूण २२२ शहरांमध्ये ही परीक्षा आयोजित केली जाणार आहे. एकूण एक हजार परीक्षा केंद्रांवर परीक्षा होणार आहे. अधिकृत माहितीनुसार एकूण १ लाख ६० हजार ८३१ विद्यार्थ्यांनी यंदा जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. आयआयटी दिल्लीने जेईई अॅडव्हान्स्डसंदर्भात जारी केलेल्या एका निवेदनात असं म्हटलं आहे की, 'ज्या विद्यार्थ्यांनी जेईई अॅडव्हान्स्डसाठी नोंदणी शुल्क भरले त्या १,५५,५११ विद्यार्थ्यांपैकी ९७.९४ टक्के विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचे शहर परीक्षा केंद्रासाठी देण्यात आले आहे. नोंदणी करताना त्यांनी टॉप तीन पसंतीक्रम द्यायचे होते.' उर्वरित २.०६ टक्के विद्यार्थ्यांनी त्यांनी नोंदणी करताना भरलेल्या आठ पसंतीक्रमांपैकी एक परीक्षा केंद्राचे शहर देण्यात आल्याचेही या निवेदनात म्हटले आहे. ५,३२० विद्यार्थी असे आहेत, ज्यांनी नोंदणी केली, मात्र शुल्क भरले नाही. ६२ टक्के विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीच्या तीन शहरांपैकी एक अलॉट झाले आहे. दिव्यांग प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन फी भरलेली असो वा नसो, त्यांना त्यांच्या पहिल्या क्रमांकाच्या पसंतीचे परीक्षा केंद्राचे शहर देण्यात आल्याचे आयआयटी दिल्लीने सांगितले. कोविड - १९ विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर यंदा जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांच्या शहरात वाढ करण्यात आली आहे. गेल्या वर्षी देशभरात १६४ शहरांमधील ६०० केंद्रांवर परीक्षा झाली होती. विद्यार्थ्यांना जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर पोहोचवण्यासाठी आयआयटी अलुम्नायने एक पोर्टलही लाँच केले आहे. Eduride असे या पोर्टलचे नाव आहे, अशी माहितीही आयआयटी दिल्लीने दिली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3kKq2oL
via IFTTT

Post a Comment

0 Comments