राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद यंदा ऑनलाइन

भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे गेली २७ वर्षे '' आयोजित केली जात आहे. शालेय विद्यार्थ्यांत मुलभूत विज्ञानाची आवड निर्माण व्हावी हे या परिषदेचे प्रमुख उद्दिष्ट्य आहे. या वर्षीची बाल विज्ञान परिषद-२०२० ही पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने संपन्न होणार आहे. महाराष्ट्र राज्यात बाल विज्ञान परिषदेचे समन्वयक म्हणून कार्य करत असलेल्या जिज्ञासा ट्रस्ट ठाणे या संस्थेशी संलग्न असलेली नवनिर्माण विज्ञान प्रबोधन ही मुंबईतील विज्ञान प्रचारक संस्था शिक्षण विभागाच्या सहकार्याने मुंबईत ही परिषद २००० पासून सातत्याने भरवीत आहे. बृहन्मुंबईतील अनेक नामांकित शाळा दरवर्षी या प्रतिष्ठित उपक्रमात सहभागी होत असतात. यासाठी संस्थेने मुंबईत विज्ञान शिक्षकांसाठी नुकत्याच दोन ऑनलाईन प्रशिक्षण कार्यशाळा भरवून मार्गदर्शन पूर्ण केले आहे. त्यानंतर व्हाट्सअप्प समूहाची निर्मिती करून शिक्षकांना प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन दिले जाणार आहे. हे प्रशिक्षित शिक्षक आपल्या शाळांतील विज्ञान संशोधनाची आवड असलेल्या विद्यार्थ्यांशी ऑनलाईन संपर्क साधून वैज्ञानिक प्रकल्पांची निर्मिती करणार आहेत, असे मुंबई विभागप्रमुख बी. बी. जाधव यांनी सांगितले आहे. या उपक्रमात १० ते १७ वयोगटातील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. तालुका, जिल्हा, विभागीय आणि राज्य अशा विविध चाचण्यातून राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेसाठी निवड केली जाते. राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ठ ठरलेल्या बाल वैज्ञानिकांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध विज्ञान परिषदेसाठी देशाचे प्रतिनिधित्व करावयाची संधी मिळते. त्याच बरोबर देशातील महत्वपूर्ण संशोधन संस्थांमध्ये संशोधन करण्याचा अनुभव सुद्धा मिळतो. राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेचा या वर्षीचा मुख्य विषय: 'शाश्वत जीवनासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान' हा असून पुढीलप्रमाणे पाच उपविषय देखील देण्यात आले आहेत - १.शाश्वत जीवनासाठी परिसंस्था २.शाश्वत जीवनास योग्य असे तंत्रज्ञान ३.शाश्वत जीवनासाठी सामाजिक नाविण्यपूर्णता ४.शाश्वत जीवनासाठी आराखडा, विकासकार्य, प्रतिकृती आणि नियोजन ५.शाश्वत जीवनासाठी पारंपारिक ज्ञान. या वर्षी कोरोना महामारीच्या संकटामुळे नोंदणी आणि सादरीकरण ऑनलाईन होणार आहे. बृहन्मुंबई जिल्हा पातळीवर, या उपक्रमाला विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्या कडून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. शाळांनी केलेल्या विनंतीनुसार, नाव नोंदणीची मुदतवाढ २१ ऑक्टोबर पर्यंत वाढवली आहे. नवे वेळापत्रक नोंदणीची शेवटची तारीख: २१ ऑक्टोबर २०२० सारांश पाठविण्याची शेवटची तारीख : १५ नोव्हेंबर २०२० परिषदेसाठी नोंदणी झालेल्या प्रकल्पांचे विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्यासाठी ऑनलाईन कार्यशाळा घेऊन आणि स्वतंत्र व्हाट्सअप्प समूहाची निर्मिती करून तज्ञ व्यक्तीमार्फत विनामुल्य मार्गदर्शन नवनिर्माण विज्ञान प्रबोधनच्यावतीने पुढील काळातही दिले जाईल. नियमावली व मार्गदर्शक तत्वे - विद्यार्थी वयोगट - लहान गट १० ते १४ वर्षे; मोठा गट – १४+ ते १७ वर्षे. - कोव्हिड १९ मुळे वैयक्तिक सहभाग किंवा दोन विद्यार्थ्यांचा गट असेल. -सारांश मर्यादा दोन्ही गटांसाठी ३०० शब्द - प्रकल्प शब्द मर्यादा दोन्ही गटांसाठी- २००० शब्द बृहन्मुंबईतील शाळांनी नाव नोंदणीसाठी खाली दिलेल्या मेल वर शाळेचे नाव, झोन, वॉर्ड आणि संपर्कासाठी मुख्याध्यापकांचे नाव व व्हाट्सअॅप मोबाइल नंबर कळवावा आपल्याला गुगल फॉर्मची लिंक पाठविण्यात येईल. इमेल – jadhavbb12@gmail.com


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/356zrAX
via IFTTT

Post a Comment

0 Comments