'या' राज्यांमध्ये उघडल्या शाळा; कोविडचं संकट मात्र कायम

देशातल्या काही राज्यांनी सोमवारपासून शाळा उघडण्याचा निर्णय घेतला आहे. आसाममध्ये प्राथमिक शाळा वगळता सर्व प्रकारच्या शिक्षण संस्था उघडण्यात आल्या आहेत. या सर्व शिक्षण संस्था करोना व्हायरस महामारीमुळे गेले सात महिने बंद होत्या. आसामसह उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये देखील सोमवारपासून शाळा सुरू झाल्या आहेत. आसाममधील शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, इयत्ता पाचवीपर्यंतचे वर्ग बंद ठेवण्यात आले आहेत. मात्र सहावीपासून पुढील वर्ग प्रत्यक्ष उघडण्यात आले आहेत. तसेच राज्यातील कॉलेज, विद्यापीठे, पॉलिटेक्निक कॉलेज, खासगी संस्था आणि कोचिंग क्लासही उघडले आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळले जात आहेत. शिवाय विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची कोणतीही सक्ती करण्यात आलेली नाही. ज्यांना शाळेत यायचे नाही, त्यांच्यासाठी ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. उत्तराखंडमध्ये दोन नोव्हेंबरपासून शाळा उघडल्या आहेत. मात्र केवळ दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांनाच शाळेत बोलावले आहे. बोर्डाच्या परीक्षांच्या अनुषंगाने या विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्यासाठी त्यांना प्राधान्याने शाळेत बोलावले आहे. हिमाचल प्रदेशातही दोन नोव्हेंबर पासून शाळा उघडल्या आहेत. येथे नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेत बोलावले आहे. कोविड-१९ च्या गाइडलाइन्सचे सक्तीने पालन करण्यास सांगितले आहे. आंध्र प्रदेश सरकारनेदेखील दोन नोव्हेंबर पासून शाळा सुरू केल्या आहेत. मात्र येथे एक दिवसाआड शाळा सुरू राहणार आहेत. म्हणजेच महिन्यातील १५ दिवस शाळा बंद असतील. एका वेळी एका वर्गात केवळ १६ विद्यार्थ्यांनाच बसण्याची परवानगी दिली गेली आहे. हरयाणा तसेच राज्यात कॉलेज आणि विद्यापीठे १६ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय तेथील राज्य सरकारने घेतला आहे. ओडिशामध्ये देखील शाळा १६ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. तामिळनाडूत दिवाळीनंतर शाळा सुरू होणार आहेत. महाराष्ट्रात काय स्थिती? महाराष्ट्रात ३० नोव्हेंबरपर्यंत शाळा-महाविद्यालये सुरू होणार नाहीत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. दिवाळीनंतर दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा उघडल्या जातील का, हे पाहणे महत्त्वाचे आहे. शाळा उघडल्या तरी पालक मात्र अजूनही आपल्या पाल्यांना शाळेत पाठवण्यास उत्सुक नसल्याचेच चित्र आहे. केंद्र सरकारच्या गाईडलाइन्सनुसार, मुलांना शाळेत येण्यासाठी कोणतीही सक्ती करण्यात येणार नाही. परिणामी शाळा उघडल्या तरी पालक मुलांना शाळेत पाठवणार का हा प्रश्न आहे. कोविड -१९ विषाणू महामारी स्थितीमुळे गेले सात महिने देशातील शाळा-महाविद्यालये बंद आहेत. विद्यार्थी घरूनच ऑनलाइन शिक्षण घेत आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3oPFP8x
via IFTTT

Post a Comment

0 Comments