म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई विज्ञान आणि संशोधन क्षेत्रातील भारतातील सर्वोच्च पुरस्कार म्हणून ओळख असलेल्या इन्फोसिस सायन्स फाउंडेशन पुरस्कार बुधवारी जाहीर करण्यात आले आहेत. सुवर्ण पदक, मानपत्र आणि एक हजार अमेरिकन डॉलर्स असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. इंजिनीअरिंग आणि कम्प्युटर सायन्स, ह्युमॅनिटीज, जैवविज्ञान, गणिती विज्ञान, भौतिकशास्त्र व सामाजिकशास्त्र अशा सहा क्षेत्रांतील अतुलनीय योगदानासाठी ही पारितोषिके दिली जातात. प्रतिष्ठित परीक्षक मंडळाने विजेत्यांच्या नावांची घोषणा केली. अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील कौराण्ट इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिकल सायन्सेसमधील प्राध्यापक तसेच अबेल पारितोषिक विजेते एस. आर. श्रीनिवास वरधान या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे होते. त्यांच्या हस्ते विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. जगभरातील मान्यताप्राप्त विद्वान आणि प्राध्यापकांचा समावेश असलेल्या परिपूर्ण परीक्षक मंडळाने २५७ नामांकनांमधून इन्फोसिस पुरस्कार विजेत्यांची निवड केली. जेथे गरिबातील गरीब मुलांनाही पोषण, शिक्षण, आरोग्यसेवा व निवारा यांची पुरेशी उपलब्धता असेल तसेच अधिक चांगल्या भवितव्याचा आत्मविश्वास असेल, असा भारत निर्माण करणे हे इन्फोसिस सायन्स फाउंडेशनच्या विश्वस्तांचे स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विचारपूर्वक आखलेल्या व प्रभावी कल्पना राबवणे आम्हाला आवश्यक आहे. या कल्पना कोणत्याही भ्रष्टाचाराशिवाय वेगाने अमलात आणणे आवश्यक आहे, असे इन्फोसिसचे संस्थापक तसेच इन्फोसिस सायन्स फाउंडेशनचे अध्यक्ष नारायण मूर्ती यावेळी म्हणाले. तर विकसित देशांना मिळालेल्या यशात त्यांनी उच्चशिक्षण व संशोधन व्यवस्थेत केलेल्या सुधारणेचा प्रमुख वाटा आहे. ज्यांच्या कामात जग सुधारण्याची क्षमता आहे अशा सर्वोत्तम शास्त्रज्ञ व संशोधकांचा गौरव करून इन्फोसिस पुरस्कार भारतामध्ये या कार्यात योगदान देत आहे, असेही ते म्हणाले. या व्हर्च्युअल सोहळ्याला विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष नारायण मूर्ती, श्रीनाथ बाटनी, के. दिनेश, एस. गोपालकृष्णन, नंदन निलेकणी, मोहनदास पै आणि एस. डी. शिबुलाल हे विश्वस्त उपस्थित होते. विश्वस्त आणि परीक्षक मंडळाखेरीज भारत तसेच परदेशांतील अनेक प्रतिष्ठित शास्त्रज्ञ व शिक्षणतज्ज्ञ आणि उद्योजक, तरुण संशोधक व विद्यार्थी या सोहळ्याला उपस्थित होते. इन्फोसिस सायन्स फाउंडेशनचे विश्वस्त इन्फोसिस प्राइझच्या माध्यमातून संशोधन समुदायासाठी जे काही करत आहेत, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. त्यांची दृष्टी आणि कटिबद्धता दोहोंसाठी मी त्यांची प्रशंसा करतो. गेल्या ७५ वर्षांमध्ये आपल्या जीवनशैलीत असामान्य बदल झाले आहेत, असे सोहळ्याचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक एस. आर. श्रीनिवास वरधान म्हणाले. आपल्या बहुतेक संशोधकांच्या संशोधनाचा थेट परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर होत असल्याने त्याची नैतिक जबाबदारी खूपच वाढते. अर्थात वैज्ञानिक संशोधने व शोधांचे घातक साइड-इफेक्ट्स नियंत्रणात ठेवण्याची प्राथमिक जबाबदारी समाज, सरकारे, आंतरराष्ट्रीय संस्था या सर्वांवर आहे, असेही ते म्हणाले. इन्फोसिस प्राइझ २०२०चे विजेते: इंजिनीअरिंग आणि कम्प्युटर सायन्स प्रा. हरी बालाकृष्णन - कम्प्युटर नेटवर्किंगमधील त्यांच्या विस्तृत योगदानासाठी तसेच मोबाइल व वायरलेस प्रणालींमधील त्यांच्या प्रभावी कामासाठी त्यांना हे पारितोषिक प्रदान करण्यात आले आहे. बालाकृष्णन यांनी केलेल्या मोबाइल टेलीमॅटिक्सच्या व्यावसायिक उपयोजनामुळे वाहन चालकाचे वर्तन सुधारण्यात मदत होते आणि रस्ते अधिक सुरक्षित होतात. .. ह्युमॅनिटीज डॉ. प्राची देशपांडे - कोलकाता येथील सेंटर फॉर स्टडीज इन सोशल सायन्सेसमधील (सीएसएसएस) डॉ. प्राची देशपांडे यांना प्रदान करण्यात आला आहे. दक्षिण आशियाई इतिहासलेखन बहुस्तरीय आणि आधुनिक करण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना हे पारितोषिक देण्यात आले आहे. डॉ. देशपांडे यांचे क्रिएटिव पास्ट्स हे पुस्तक आणि अनेक लेख यांमधून महाराष्ट्रातील मराठा कालखंडापासूनच्या आधुनिक इतिहासलेखनात झालेल्या उत्क्रांतीबद्दल मोलाची माहिती मिळते. तसेच, पश्चिम भारताच्या इतिहासाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन त्यांच्या लेखनातून मिळतो. .. लाइफ सायन्स डॉ. राजन संकरानारायणनम - हैदराबाद येथील सेंटर फॉर सेल्युलर अँड मोलेक्युलर बायोलॉजीचे (सीसीएमबी) डॉ. राजन संकरानारायणनम यांना प्रदान करण्यात आले आहे. जीवशास्त्रातील अत्यंत मूळ यंत्रणा समजून घेण्यामध्ये दिलेल्या मूलभूत योगदानाबद्दल अर्थात जनुकीय संकेतांचा अचूक अर्थ लावून प्रथिनयुक्त रेणू तयार करण्यात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले आहे. प्रतिजैविके (अँटिबायोटिक्स) तसेच इम्युनोसप्रेसंट्स यांसारख्या औषधांच्या विकासामध्ये डॉ. संकरानारायणन यांच्या कामाचे उपयोजन होऊ शकते. गणिती विज्ञान प्रा. सौरव चॅटर्जी - स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीतील प्राध्यापक सौरव चॅटर्जी यांना संभाव्यता (प्रोबेबिलिटी) व सांख्यिकी भौतिकशास्त्राबाबत केलेल्या चाकोरीबाह्य कामाबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. प्राध्यापक चॅटर्जी यांच्या सहयोगात्मक कार्याने, यादृच्छिक (रॅण्डम) आलेखाच्या मोठ्या विचलनासारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. .. भौतिकशास्त्र प्रा. अरिंदम घोष - बेंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेसमधील (आयआयएस) प्राध्यापक अरिंदम घोष यांना भौतिकशास्त्रे विभागातील पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे. कार्यात्मक इलेक्ट्रॉनिक, थर्मोइलेक्ट्रिक आणि ऑप्टोइलेक्ट्रॉनिक उपकरणांची अत्याधुनिक श्रेणी तयार करण्यासाठी आण्विकदृष्ट्या बारीक अशी द्विमितीय अर्धवाहके विकसित केल्याबद्दल प्रा. घोष यांना हे पारितोषिक दिले जात आहे. त्यांनी कमी वजनाच्या पदार्थांतील आंतरक्रियेसाठी तयार केलेला नवीन प्लॅटफॉर्म, क्वाण्टम तंत्रज्ञाने तसेच संवेदनांवर, अत्यंत मूलभूत मार्गाने प्रभाव टाकतो. .. सामाजिकशास्त्र प्रा. राज चेट्टी - हार्वर्ड विद्यापीठातील प्रा. राज चेट्टी यांना सामाजिकशास्त्र या विभागात प्रदान करण्यात आला आहे. आर्थिक संधीतील अडथळे ओळखणे आणि लोकांना दारिद्र्यातून मुक्त होऊन आयुष्याची निष्पत्ती सुधारण्याची संधी देणारे उपाय विकसित करणे यांबाबत केलेल्या मूलभूत संशोधनाबद्दल डॉ. चेट्टी यांना हे पारितोषिक प्रदान करण्यात आले आहे. महाकाय डेटाची चिकित्सा करून त्यातून नमुने शोधण्याची तसेच संशोधनाची असामान्य क्षमता प्राध्यापक चेट्टी यांच्याकडे आहे आणि त्यामुळे अर्थशास्त्राच्या शाखांमध्ये मोठी स्थित्यंतरे येण्याची शक्यता आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3lykC0b
via IFTTT