तीन पिढ्यांच्या पाठपुराव्यानंतरही मराठी विद्यापीठ नाहीच!

म. टा. प्रतिनिधी, मुंबई राज्यातील मराठी विद्यापीठाची मागणी ८५ वर्षांपासून सुरू असून, ती प्रलंबितच आहे. १९३४ मध्ये नागपुरात झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात या मागणीचा ठराव दत्तो वामन पोतदार यांनी मांडला. तेव्हापासून आजवर या मागणीचा सातत्याने पाठपुरावा महाराष्ट्रातील तीन पिढ्या करीत आहेत, याची पुन्हा आठवण मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी करून दिली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये मराठी विद्यापीठासाठी ठराव करून, ते राज्य सरकारकडे पाठवूनही त्याबद्दल कोणतेही पाऊल उचलले जात नाही, याबद्दल मराठी भाषाप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. मराठी विद्यापीठासाठी डॉ. वि. भि. कोलते, डॉ. भास्कर भोळे, डॉ. श्रीपाद जोशी आणि महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडी यांनी सातत्याने मागणी केली आहे. नागपूर येथील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारात उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे स्थापनेच्या स्थितीबद्दल विचारणा केली. या माहितीवरून मराठी विद्यापीठ म्हणजे काय हे सरकारला अद्यापही कळलेले नाही आणि ते स्थापन होऊ नये अशा रीतीनेच कार्यवाही सुरू आहे, अशी टीका डॉ. जोशी यांनी केली. मराठी विद्यापीठ स्थापन केल्यास पारंपरिक विद्यापीठांकडे कोणतेच काम उरणार नाही, ती पांढरा हत्ती होतील, त्यातील गुंतवणूक व्यर्थ ठरेल, स्थळावरून वादंग होतील त्यामुळे ते स्थापन करणे योग्य होणार नाही असे निरीक्षण उच्च व तंत्रशिक्षण विभागाने १० वर्षांपूर्वी नोंदवल्याचे दस्तावेजांवरून स्पष्ट झाल्याचे त्यांनी सांगितले. तज्ज्ञांच्या दोन समित्यांची शिफारस मधल्या काळात केली जाऊनही, तसेच तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी तर याबाबत तज्ज्ञांची उच्चाधिकार समिती नेमण्याची कार्यवाही सुरू असल्याचे सांगूनही अशा समितीबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध न झाल्याने याबद्दलही शंका उपस्थित होत असल्याचे ते म्हणाले. कोणताच पक्ष गंभीर नाही निवडणुकीपूर्वी जाहीरनाम्यात दिलेले आश्वासनही प्रलंबित आहे. त्यामुळे मराठी विद्यापीठाच्या स्थापनेबद्दल आणि पर्यायाने मराठीबद्दल कोणताच पक्ष गंभीर नसल्याची टीका पुन्हा होत आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2NIgkIF
via IFTTT

Post a Comment

0 Comments