विद्यापीठ परीक्षा ऑनलाइन आणि ऑफलाइनही: उदय सामंत

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई विद्यापीठ आणि त्या अंतर्गत येणाऱ्या सर्व कॉलेजांतील पदवी, पदव्युत्तर आदी अभ्यासक्रमांच्या परीक्षा ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने घेतल्या जातील, अशी माहिती शनिवारी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री यांनी दिली. वाढत्या करोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना ऑफलाइन आणि ऑनलाइन अशा दोन्ही पद्धतीने परीक्षा उपलब्ध झाल्याने ते स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन पर्याय निवडू शकतील. त्यासाठी त्यांना ही मुभा दिली जाईल, असेही सामंत यांनी सांगितले. करोनामुळे राज्यातील विद्यापीठ आणि त्याअंतर्गत असलेल्या कॉलेजांमध्ये पदवी, पदव्युत्तरच्या प्रथम वर्षाचे प्रवेश उशिराने झाले आहेत. अनेक कॉलेजांत या पदवीच्या प्रथम वर्षाचे अध्ययन नुकतेच सुरू झाले आहेत. त्यामुळे प्रथम वर्षाच्या परीक्षा उशिरा घेतल्या जातील आणि त्यासाठीचे नियोजन राज्यातील संबंधित विद्यापीठांकडून केले जाईल. तर द्वितीय आणि अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम अद्याप ऑनलाइन पद्धतीने सुरू असून, या वर्गाच्या परीक्षा वेळेतच घेतल्या जातील. त्यासाठी राज्यातील सर्व विद्यापीठांकडून आढावा घेतला जात आहे, अशी माहितीही सामंत यांनी शनिवारी दिली. राज्यात पुन्हा करोनाने डोके वर काढल्याने पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मागील वर्षाप्रमाणे यंदाही या परीक्षा ऑनलाइन आणि इतर विविध पर्याय देऊन त्या घेतल्या जाव्यात, अशी मागणी विविध विद्यार्थी संघटनांकडून केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर सामंत यांनी पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या परीक्षा वेळेत होतील आणि त्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन आणि ऑफलाइन असे दोन्ही पर्याय उपलब्ध असतील, अशी माहिती दिली. दरम्यान, इंजिनीअरिंग आणि पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा या १०० टक्के ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे. त्यानुसार या परीक्षांचे नियोजन केले जाईल, असे सामंत म्हणाले. त्यामुळे राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेबाबतचा गोंधळ काहीसा कमी होण्यास मदत झाली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3pVDwjG
via IFTTT

Post a Comment

0 Comments