प्राध्यापक भरतीत खो खो चा खेळ; हजारो नेटसेटधारक नोकरीच्या प्रतिक्षेत

कोल्हापूर: गेल्या सात वर्षापासून बंद असलेली वरिष्ठ कॉलेजमधील प्राध्यापक भरतीत सध्या खो खो चा खेळ सुरू आहे. सरकारच्या सततच्या आश्वासनामुळे राज्यभरातील पन्नास हजारावर नेटसेट धारक प्रचंड अस्वस्थ आहेत. तातडीने या जागा भरू हे उच्च शिक्षण मंत्र्यांकडून दिले जाणारे आश्वासन वर्षानंतरही आश्वासनच राहिल्याने अस्वस्थता वाढतच आहे. राज्यात सध्या विविध कॉलेजमधील पंधरा हजारावर प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. २०१३ पासून ही भरती बंद आहे. या पदावर भरती व्हावी म्हणून राज्यातील पन्नास हजारावर नेटसेटधारक व पीएच.डी पदवी मिळवलेल्यांनी प्रचंड पाठपुरावा केल्यानंतर पाच वर्षापूर्वी युती सरकारने चाळीस टक्के भरतीला मान्यता दिली. यामुळे भरतीची आशा निर्माण झाली होती, पण सरकारने प्रत्यक्षात कार्यवाही केली नाही. उलट पुन्हा नवीन आदेश काढून भरतीला बंदी घालण्यात आली. नवीन सरकार आल्यानंतर ही भरती सुरू होईल अशी आशा नेट सेट व पीएच.डी धारकांना होती. याच काळात करोना संसर्गामुळे राज्यासमोरील आर्थिक संकट वाढले. यामुळे ही भरती थांबली. ही भरती तातडीने करावी म्हणून पुन्हा एकदा आंदोलन आणि पाठपुरावा सुरू झाला आहे. गेले काही महिने राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे ‘मंत्रालय आपल्या दारी’ हा उपक्रम राबवत आहेत. प्रत्येक विद्यापीठात जाऊन तेथील समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचा ते प्रयत्न करत आहेत. ते जातील तेथे प्राध्यापकांच्या भरतीचा प्रश्न विचारला जात आहे. आर्थिक बाबीशी निगडित प्रश्न असल्याने लवकरच हा प्रश्न सोडवू असे आश्वासन ते देत आहेत. पण, प्रत्यक्षात कारवाही होत नसल्याने या उमेदवारात अस्वस्थता पसरली आहे. राज्याच्या प्राध्यापकांच्या पंधरा हजारावर जागा रिक्त आहेत. बहुतांशी जागावर सीएचबी तत्त्वावर प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात आली आहे. करोना संसर्गामुळे अनेक महिने कॉलेज बंद राहिल्याने तास झाले नाहीत. तासच झाले नसतील तर मग मानधन कसे द्यायचे असा प्रश्न प्रश्न संस्थाचालकांनी सुरू केला आहे. यामुळे या सीएचबी प्राध्यापकांचा प्रश्न आणखी गंभीर झाला आहे. ‘मान’ ही नाही आणि ‘धन’ ही नाही अशी त्यांची अवस्था झाली आहे. राज्यात पहिल्या टप्प्यात अडीच हजार प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरण्याचा निर्णय सहा महिन्यापूर्वी झाला. पण, प्रत्यक्षात काहीच कार्यवाही झाली नाही. यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी २२ फेब्रुवारी रोजी मंत्रालयात बैठक बोलविण्यात आली होती. पण करोनाचे कारण पुढे करत ही बैठक पुढे ढकलण्यात आली. आर्थिक कारण पुढे करत या भरतीबाबत निर्णय घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. सतत काही ना काही कारणे पुढे करत भरतीला खो दिला जात आहे. यामुळे मात्र राज्यातील पन्नास हजार नेटसेट धारकांवर उपासमारीची वेळ आली आहे. सीएचबी तत्त्वावरील प्राध्यापकांना मानधन मिळत नसल्याने अनेकांना रोजंदारी कामगार म्हणून कामाला जावे लागत आहे. हेही वाचा: महिन्यात अभ्यासक्रम कसा संपणार ? बहुतांशी कॉलेजमध्ये प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. करोना संसर्गामुळे सहा महिने कॉलेज बंद होते. आता ती सुरू झाली आहेत. ऐंशी टक्के अभ्यासक्रम पूर्ण करून त्यावर परीक्षा घेण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे. अनेक काही ठिकाणी पूर्णवेळ प्राध्यापक नाहीत. काही ठिकाणी सीएचबी तत्त्वावरही प्राध्यापकांची नियुक्ती झाली नाही. अशावेळी महिनाभरात 80 टक्के अभ्यासक्रम पूर्ण कसा करणार, परीक्षा कसा घेणार कसे घेणार असा सवाल केला जात आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3dINVNg
via IFTTT

Post a Comment

0 Comments