सीए परीक्षेत मुंबईच्या कोमलची बाजी

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई सीए फायनल परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. यंदा घाटकोपरची कोमल जैन ही विद्यार्थिनी देशात पहिली आली आहे. माटुंगा येथील पोदार कॉलेजमधील या विद्यार्थिनीने पहिल्या प्रयत्नात हे यश मिळवले आहे. इंस्टिट्यूट ऑफ चार्टड अकाउंट ऑफ इंडिया (आयसीएआय)ने मंगळवारी नोव्हेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या सीए अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत कोमलने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. तिला ८०० पैकी ६०० गुण मिळाले आहेत. तर या परीक्षेत सुरत येथील मुदित अग्रवाल आणि मुंबईची राजवी नाथवानी या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला आहे. यंदाच्या परीक्षेत दोन्ही ग्रुप घेऊन परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी १४.५ टक्के म्हणजे १९ हजार २८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर फक्त ग्रुप १चा निकाल १२.८ टक्के तर ग्रुप २चा निकाल ३१ टक्के इतका लागला आहे. यंदा ३२ हजार विद्यार्थ्यांनी ग्रुप १ तर २८ हजार विद्यार्थ्यांनी ग्रुप २ ची परीक्षा दिली. घाटकोपरला राहणाऱ्या कोमलने २०१९मध्ये पोदार कॉलेजमधून बीकॉमची पदवी मिळवली. करोना महामारीमुळे सीएची परीक्षा नोव्हेंबर महिन्यात झाली. या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाल्यानंतर मी देशात पहिली आल्याचे समजले आणि खूप आनंद झाल्याचे कोमलने टाइम्स वृत्त समुहाशी बोलताना सांगितले. तिचे वडील निवृत्त अकाउंटन्ट आहेत तर आई कॉमर्स शाखेची पदवीधर असून गृहिणी आहे. यामुळे मला लहानपणापासूनच कॉमर्समध्येच करिअर करायची इच्छा होती. ही परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर कन्सल्टन्सी किंवा फायनान्स या दोन पैकी कोणत्या क्षेत्रात जायचे याबाबत अद्याप मी निर्णय घेतला नसल्याचे तिने सांगितले. यंदा विविध करोनामुळे परीक्षा सतत पुढे ढकलली जात होती. यामुळे काही प्रमाणात नैराश्य आले होते. पुन्हा तेच वाचण्याची इच्छाही होत नव्हती. पण अखेर आमची परीक्षा चांगली झाली आणि चांगले यश मिळाल्याचेही तिने सांगितले. तिला बुद्धीबळ खेळायला आवडत असून ताण आल्यावर व्यापार विषयक लिखाण वाचणे आणि गाणी ऐकणे ती पसंत करत असल्याचेही तिने सांगितले. जुन्या पद्धतीने घेतलेल्या झालेल्या परीक्षेत जयपूरचा मयांक सिंग प्रथम आला आहे. या परीक्षेला चार हजार १०० विद्यार्थी बसले होते यापैकी ५.८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3rdW3sp
via IFTTT

Post a Comment

0 Comments