Also visit www.atgnews.com
तांत्रिक घोळामुळे नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा पहिल्याच दिवशी रद्द
म. टा. प्रतिनिधी, ऑनलाइन पोर्टलद्वारे घेण्यात येणारी हिवाळी २०२०ची परीक्षा पहिल्याच दिवशी रद्द करण्याची नामुष्की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठावर गुरुवारी ओढवली. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामनाही विद्यापीठाला करावा लागला. सकाळी परीक्षा प्रारंभ झाल्यापासून सुरू झालेला घोळ संध्याकाळपर्यंत कायम राहिल्याने अखेर २५ मार्च रोजीची परीक्षा तांत्रिक कारणामुळे रद्द करीत असल्याचे विद्यापीठाला जाहीर करावे लागले. संपूर्ण दिवसभर पोर्टलवर येत असलेल्या तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थी, कॉलेजे आणि विद्यापीठ प्रशासन अशा तिन्ही घटकांना प्रचंड अडचणींना तोंड द्यावे लागले. नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी २०२०च्या परीक्षांना गुरुवारपासून प्रारंभ झाला. २५ मार्च ते ५ एप्रिलपर्यंत परीक्षांचा पहिला टप्पा आहे. या परीक्षांकरिता विद्यापीठाने पोर्टल तयार केले असून त्यामार्फत विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावयाच्या आहेत. गुरुवारी सकाळी ८ वाजता या परीक्षेला प्रारंभ झाला. मात्र, अगदी सुरुवातीपासून विद्यार्थ्यांना पोर्टलवर लॉगिन करण्यात अडचणी येत होत्या. विद्यार्थ्यांनी लॉगिन करून पेपर देण्याचा प्रयत्न केला असता सर्व्हरमध्ये अडचणी येत असल्याचे संदेश दाखविले जात होते. ज्या लिंकद्वारे पेपर सोडवायचे होते ती लिंकच उघडत नसल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. काही जणांना लॉगिन केल्यावर अडचणी आल्या. लॉगआउट केल्यानंतर पुन्हा लॉगिन करण्यासाठी अर्धा तास थांबावे लागेल, असेही सांगण्यात येत होते. पेपरचा एक तासाचा वेळ सर्व्हर घोळात निघून गेल्यास आपल्याला परीक्षेला मुकावे लागेल, या विचारानेही अनेक विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. पहिल्या सत्रातील विद्यार्थ्यांना दुपारी ४ वाजेपर्यंत प्रयत्न करीत राहण्याचे संदेश विद्यापीठाकडून देण्यात आले. याशिवाय, विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये आणि तांत्रिक घोळ सुधारण्यात येतो आहे, अशाही सूचना देण्यात येत होत्या. मात्र, सायंकाळपर्यंत परीक्षा पोर्टलचा हा घोळ दूर करू न शकल्याने विद्यापीठाला पहिल्या दिवशीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्याची नामुष्की सहन करावी लागली. गुरुवारी बीए, बीबीए, बीएस्सी, बीएलएलबी, बीई या अभ्यासक्रमांच्या परीक्षा होणार होत्या. होऊ न शकलेल्या पेपरच्या नंतरच्या तारखा अद्याप विद्यापीठाने जाहीर केलेल्या नाहीत. हेल्पलाइन व्यस्त, विद्यार्थी त्रस्त विद्यार्थ्यांना पेपर सोडविताना काही अडचणी आल्यास त्या सोडविण्यासाठी विद्यापीठाने हेल्पलाइनची व्यवस्था केली होती. सर्व्हरमध्ये अडचणी सुरू झाल्याबरोबर विद्यार्थ्यांचे कॉलेजांना, तसेच या हेल्पलाइनवर फोन सुरू झाले. कॉलेजांमधूनही या हेल्पलाइन क्रमांकावर फोन जात होते. त्यामुळे, हेल्पलाइन क्रमांक सातत्याने व्यस्त होते. शिवाय, या क्रमांकांवर संपर्क होत नसल्याच्याही तक्रारी विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी मांडल्या. छायाचित्र घेणे चुकले म्हणून... पोर्टलवर अडचणी येऊ लागल्यानंतर विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना संदेश येऊ लागले होते. विद्यापीठाच्या बाजूने 'सर्व्हरमध्ये अडचणी असल्याने गोंधळ होतो आहे, कृपया अर्धा तास वाट बघावी', असे सांगण्यात आले. याशिवाय, विद्यार्थी योग्यप्रकारे स्वत:चे छायाचित्र घेऊ शकत नसल्याने अडचणी येत आहेत. छायाचित्राकरिता विद्यापीठाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करा, घाबरून जाऊ नका असेही विद्यार्थ्यांना सांगण्यात येत होते. शुक्रवारचे पेपर वेळापत्रकानुसार सर्व्हरच्या अडचणींमुळे विद्यापीठाने सध्या केवळ गुरुवारचे पेपर पुढे ढकलले आहेत. शुक्रवारचे पेपर आधी ठरविलेल्या वेळापत्रकाप्रमाणेच होणार आहेत. यासंदर्भात विद्यापीठाने पुढील सूचना अद्यापपर्यंत दिलेल्या नाहीत. त्यामुळे, शुक्रवारच्या पेपर्सच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना तयार राहावे लागेल, असे विद्यापीठातर्फे सांगण्यात आले. उमटल्या संतप्त प्रतिक्रिया परीक्षांमध्ये आलेल्या या तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थी, पालक, प्राध्यापक, कॉलेज प्रशासन यांच्यात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. उन्हाळी परीक्षांदरम्यान अॅपचा उपयोग करण्यात आला होता. त्यावेळी आलेल्या अडचणींमुळे यंदा पोर्टलद्वारे परीक्षा घेण्यात येते आहे. मात्र, यावेळीदेखील पहिल्याच दिवशी तांत्रिक घोळ झाला. विद्यापीठाला ऑनलाइन परीक्षा घेण्यात येत संपूर्ण अपयश येत असल्याची प्रतिक्रिया नोंदविण्यात आली. विद्यार्थ्यांना आल्या अडचणी - लॉगिन करता सर्व्हर काम करीत नसल्याचे संदेश - आपोआप लॉगआउट होणे - लॉगिन करण्याचे वारंवारचे प्रयत्न अयशस्वी - पेपर देताच न आल्याने विद्यार्थ्यांवर ताण - सर्व्हर, वेबकॅमबद्दल आल्या अडचणी
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3d5QDKR
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments