नागपूर विद्यापीठ परीक्षांचे गाडे रुळावर

म. टा. प्रतिनिधी, राष्ट्रसंत तुकडोजी नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी २०२० परीक्षांचा दुसरा दिवस कोणत्याही अडचणींविना पार पडला. परीक्षांचे गुरुवारी गडगडलेले गाडे दुसऱ्या दिवशी रुळावर आले. सर्व अभ्यासक्रमांच्या ऑनलाइन परीक्षा कोणत्याही अडचणींविना घेण्यात विद्यापीठ प्रशासनाला यश आले. ऑनलाइन पोर्टलचा उपयोग करून विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा सध्या घेण्यात येत आहेत. २५ मार्च रोजी या परीक्षांचा पहिला टप्पा सुरू झाला. पहिल्याच दिवशी सर्व्हरची अडचण आणि इतर तांत्रिक घोळाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे, पहिल्या दिवशीची परीक्षाच रद्द करण्याची वेळी विद्यापीठावर आली होती. या सगळ्या प्रकारामुळे, दुसऱ्या दिवशीचे पेपर सुरळीत पार पडतील किंवा नाही याबद्दल शंका व्यक्त करण्यात येत होती. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच परीक्षा व्यवस्थित पद्धतीने सुरू झाली. विविध अभ्यासक्रमांचे दिवसभरात सगळ्या प्रक्रिया योग्य पद्धतीने पार पडल्या. ज्या विद्यार्थ्यांना काही तांत्रिक अडचणींना तोंड द्यावे लागले त्यांच्याही अडचणी लगेचच सोडविण्यात विद्यापीठाला यश आले. अनुपस्थित विद्यार्थ्यांची वाढली संख्या! शुक्रवारच्या विविध अभ्यासक्रमांच्या पेपर्सना हजारो विद्यार्थी बसले होते. त्यापैकी, काहींनी पेपर दिला नाही. यामध्ये बीसीए अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त होती. इतक्या मोठ्या संख्येने हे विद्यार्थी अनुपस्थित का राहिले, याचे कारण शोधावे लागणार आहे. परीक्षा अर्ज भरल्यानंतर लागलेल्या निकालांमध्ये काही विद्यार्थी बॅकलॉग विषयांमध्ये उत्तीर्ण झाल्याने ते अनुपस्थित राहिले असण्याची शक्यता आहे, असे नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी सांगितले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/39zgGt1
via IFTTT

Post a Comment

0 Comments