पर्यायी विषय म्हणून 'एनसीसी'ला मान्यता?

म. टा. प्रतिनिधी, पुणे विद्यापीठांनी 'नॅशनल कॅडेट कॉर्पचा' () अभ्यासक्रमात समावेश करावा व पर्यायी विषय म्हणून 'एनसीसी'ला मान्यता देण्यात यावी, असा प्रस्ताव 'एनसीसी'च्या मुख्यालयाने विद्यापीठ अनुदान आयोगाकडे () दाखल केला आहे. यावर 'यूजीसी'ने सर्व विद्यापीठांना चर्चेसाठी बोलावले असून, लवकरात लवकर या संदर्भातील आपले मत विद्यापीठांनी 'यूजीसी'कडे दाखल करावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. या प्रस्तावामुळे 'एनसीसी'ला पर्यायी विषय म्हणून मान्यता मिळण्याची शक्यता आहे. देशातील शाळा आणि महाविद्यालयांत 'एनसीसी'मध्ये दाखल होऊन शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी सैनिकी प्रशिक्षणाचे धडे घेतात. देशातील सुरक्षा दलांमध्ये जाऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी 'एनसीसी' पहिली पायरी ठरते. यामुळे 'एनसीसी'ला विषय म्हणून अभ्यासक्रमात मान्यता मिळावी, असा प्रस्ताव 'एनसीसी'च्या मुख्यालयाकडून दाखल करण्यात आला आहे. महाविद्यालयांमध्ये तीन वर्षांच्या प्रशिक्षणानंतर विद्यार्थ्यांना 'एनसीसी'चे 'सी-सर्टिफिकेट' मिळते. लष्करी भरतीत त्याची दखल घेतली जाते; परंतु याचा अभ्यासक्रमात समावेश नसल्याने त्याचे गुण विद्यार्थ्यांना मिळत नाहीत. शारीरीक शिक्षण हा विषय म्हणून विद्यार्थ्यांना शिकवला जातो; तसेच 'एनसीसी'ही असावे, अशी मांडणी 'एनसीसी' मुख्यालयाकडून करण्यात आली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2QaGNjh
via IFTTT

Post a Comment

0 Comments