ऐन लॉकडाऊनमध्ये ऑफलाइन परीक्षा! पाच विद्यार्थी बाधित

म. टा. वृत्तसेवा, पनवेल राज्य सरकारने घोषित केलेल्या लॉकडाउन नियमांचे उल्लंघन करून पनवेल शहरातील बी. पी. मरीन अॅकॅडमीत विद्यार्थ्यांची ऑफलाइन परीक्षा घेतली जात होती. पनवेल महापालिकेच्या पथकाने धाड टाकून हा प्रकार उघडकीस आणला. विद्यार्थ्यांच्या करोनाचाचणीत पाचजण बाधित आढळल्यामुळे संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. वाढत्या करोनारुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने १५ मेपर्यंत लॉकडाउन वाढविला आहे. महाविद्यालय, वसतिगृह बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अनेक परीक्षा रद्द केल्या आहेत. तर, विद्यापीठाकडून परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याच्या आदेश असताना पनवेलमधील बी. पी. मरीन अकॅडमी या संस्थेत १५०हून अधिक विद्यार्थ्यांना एकत्र ठेवून, विद्यार्थ्यांचे वर्ग भरविले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला. सात विद्यार्थ्यांना वसतिगृहाच्या एका खोलीत ठेवणे, सर्वांना एकत्र जेवण देणे, सुरक्षित अंतर न पाळणे... अशा प्रकारे करोनाच्या नियमांचे उल्लंघन केले जात होते. महापालिकेकडे तक्रार आल्यानंतर सहाय्यक आयुक्त वंदना गुळवे यांच्या पथकाने गुरुवारी धाड टाकून संबंधित प्रकार उघडकीस आणला. बी. पी. मरिन अॅकॅडमीमधील काही विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडे तक्रार केल्यानंतर हा गंभीर प्रकार उघड झाला आहे. अभाविप पनवेल महानगर मंत्री वैष्णव देशमुख यांनी पनवेल महानगरपालिका प्रशासन, पनवेल शहर पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर महापालिकेने अॅकॅडमीत जाऊन पाहणी केली. सर्व विद्यार्थ्यांची करोनाचाचणी केली असता पाचजण बाधित असल्याचे समोर आले. या प्रकाराबाबत अॅकॅडमीचालकांवर गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती उपायुक्त डॉ. सचिन पवार यांनी सांगितले. करोनाबाधित आढळलेल्या विद्यार्थ्यांना महापालिकेच्या कोन येथील अलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/334Kji2
via IFTTT

Post a Comment

0 Comments