ऑक्सिजन निर्मितीसाठी आयआयटीचा पुढाकार

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई देशातील करोनाची वाढती रुग्णसंख्या आणि वाढती ऑक्सिजनची मागणी पूर्ण करण्यासाठी देशभरात विविध स्तरावरून प्रयत्न होत आहेत. यातच आयआयटी मुंबईनेही आघाडी घेत हवेतून शोषून घेण्याच्या (पीएसए) प्रक्रियेवर आधारित नायट्रोजन संयंत्राचे पीएसए ऑक्सिजन संयंत्रामध्ये रूपांतर केले आहे. यामुळे सहज आणि सोप्या पद्धतीने ऑक्सिजनची उपलब्धता शक्य होणार आहे. आयआयटी मुंबईत असलेल्या नायट्रोजन निर्मिती प्रकल्पात शास्त्रज्ञांनी वेगवेगळे प्रयोग करून त्यामध्ये ऑक्सिजनची यशस्वी निर्मिती केली. सुरुवातीच्या चाचण्यांमध्ये ३.५ एटीएम इतक्या दाबाने ९३ ते ९६ टक्के शुद्ध ऑक्सिजन उत्पादन शक्य झाले. या ऑक्सिजनचा उपयोग करोनाकाळात रुग्णालयांमध्ये तसेच विशेष सुविधा केंद्रांमध्ये अविरत पुरवठा करण्यासाठी होऊ शकणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या नायट्रोजन संयंत्र रचनेची योग्य जुळवाजुळव आणि कार्बन ते झोलाइटमधील रेण्वीय चाळणी बदलून उपकरणात बदल केल्याचे आयआयटी मुंबईच्या संशोधन आणि विकास विभागाचे अधिष्ठाता प्रा. मिलिंद अत्रे यांनी सांगितले. कच्चा माल म्हणून वातावरणातील हवा शोषून घेणारी अशी काही नायट्रोजन संयंत्रे भारतभर विविध औद्योगिक युनिटमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे हे प्रत्येक औद्योगिक युनिट आपल्या नायट्रोजन संयंत्राचे ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या संयंत्रात रूपांतर करू शकेल. अशाप्रकारे सध्याच्या सार्वजनिक आरोग्य आपत्कालीन परिस्थितीत हे आपल्यासाठी उपयुक्त होऊ शकेल, असेही ते म्हणाले. हा प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्प , टाटा कन्सल्टिंग इंजिनीअर्स आणि पीएसए नायट्रोजन आणि ऑक्सिजन संयंत्र उत्पादक असलेले स्पॅन्टेक इंजिनीअर्स यांचा संयुक्त प्रयत्न आहे. ही संकल्पना प्रत्यक्षात आणून प्रमाणित करण्याच्या दृष्टीने, आयआयटीच्या रेफ्रिजरेशन अ‍ॅन्ड क्रायोजेनिक्स प्रयोगशाळेत पीएसए नायट्रोजन संयंत्राचे ऑक्सिजन संयंत्रात रूपांतर केले आहे. या पथदर्शी प्रयोगाचा देशभरात फायदा होऊ शकेल. अशा प्रमाणित कार्यपद्धतीला अंतिम स्वरूप देण्यासाठी आयआयटी मुंबई, टाटा कन्सल्टिंग इंजिनीअर्स आणि स्पॅन्टेक इंजिनीअर्स यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. हे संशोधन म्हणजे शैक्षणिक संस्था आणि उद्योग यांच्यातील उत्तम समन्वयाचे उदाहरण असल्याचे मत आयआयटीचे संचालक प्रा. सुभाषिश चौधरी यांनी सांगितले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3nDyvN5
via IFTTT

Post a Comment

0 Comments