करिअर प्लॅनिंगचे महत्त्व; 'या' टिप्स ध्यानात घेऊन निवडाल करिअर तर नक्की यशस्वी व्हाल

सुचित्रा सुर्वे, ग्रोथ सेंटर करिअर म्हणजे काय याचा विचार करताना कोणते समज-गैरसमज असतात ते आपण मागच्या लेखात पाहिले. एकदा हे गैरसमज दूर झाले की, स्वतःच्या करिअरबाबत विचार करण्यास सुरुवात करणे आवश्यक आहे. सध्या उपलब्ध असलेल्या विविध पर्यायांमुळे करिअर निवडीची प्रक्रिया आव्हानात्मक वाटू शकते. करिअर प्लॅनिंग कसे करायचे ते समजून घेण्यापूर्वी त्याचे महत्त्व काय आहे हे समजून घेऊ या. आधी सांगितल्याप्रमाणे, करिअर हा आजीवन प्रवास आहे. आणि या प्रवासाचा आनंद घेण्याबरोबरच तुम्हाला अवगत असलेल्या, तसेच तुमच्यासाठी उत्कृष्ट ठरणाऱ्या गोष्टी (बौद्धिक उत्तेजन, पैसा, कीर्ती इत्यादी) सुनिश्चित करणे आवश्यक आहे. शेवटी तुमची जीवनशैली तुम्ही निवडलेल्या करिअरवर अवलंबून असल्यामुळे योजना आखून करिअरचा निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. ठरल्याप्रमाणे सगळेच साध्य होईल असे नाही. परंतु ही योजना तुम्हाला ट्रॅकवर ठेवण्यास, तसेच आव्हाने जाणून बॅकअप प्लॅन्स तयार करण्यास मदत करते. म्हणूनच करिअरची योजना बनवताना काही बाबी लक्षात ठेवाव्यात. * तुम्ही ज्यात कुशल आहात ते शोधण्याचा प्रयत्न करा. * तुमचे व्यक्तिमत्त्व आणि स्वभावास काय अनुकूल आहे ते समजून घ्या. * तुम्हाला कोणत्या गोष्टी करण्यात रस आहे ते शोधा. * निवडलेल्या करिअरसाठी उपलब्ध असलेले शैक्षणिक मार्ग समजून घ्या. * कोर्स पूर्ण करण्यासाठी आणि कारकीर्दीत स्थिरस्थावर होण्यासाठी आवश्यक असलेला वेळ शोधा. * होणाऱ्या खर्चाबद्दल जागरूक रहा. * शैक्षणिक पात्रतेव्यतिरिक्त कोणती कौशल्ये आवश्यक आहेत आणि त्याचा विविध क्षेत्रात कसा उपयोग होऊ शकतो हे समजून घ्या. * नोकरीच्या संधींचा शोध घ्या. * करिअरच्या मागण्या, आव्हाने, साधक आणि बाधक जाणून घ्या. * तुमची मूल्ये कोणती आहेत, तसेच करिअरच्या कारकिर्दीत तुम्ही काय साध्य करू इच्छिता (प्रसिद्धी, पैसा, स्थिरता, साहस) हे ठरवा. * तज्ज्ञ व्यक्तींचे (करिअर समुपदेशक किंवा त्या क्षेत्रातीलव्यक्ती) मार्गदर्शन घ्या. आजचे सपर्धात्मक युग, जागांचा अभाव आणि अधिक अर्जदार तसेच चांगले विद्यार्थी या सर्व बाबी लक्षात घेऊन बॅकअप प्लॅन तयार ठेवणे नक्कीच हितकारक ठरेल. अनेक वेळा बॅकअप प्लॅन्स बनवण्याकडे काणाडोळा केला जातो. केवळ चांगले गुण मिळवण्याने इच्छित कोर्स किंवा महाविद्यालयात प्रवेश मिळेल याची हमी देता येऊ शकत नाही; म्हणूनच बॅकअप प्लॅन असणे आजच्या अनिश्चित काळात अर्थपूर्ण आहे. एखाद्याच्या प्रभावामुळे निर्णय घेण्यापेक्षा योग्य माहितीच्या विश्लेषणावर आधारित निर्णय घ्या. तुमच्या करिअर निवडीबाबत चर्चा करा. विविध पर्याय शोधा, तसेच कोणताही पर्याय निवडताना वर नमूद केलेल्या गोष्टी लक्षात ठेवून पुनरावलोकन करा. अद्यापही जरी कोणता निर्णय घेतला नसेल तरी आता प्रारंभ करा. असे बरेच लोक आहेत जे एका आयुष्यात बऱ्याच गोष्टी करतात. परंतु स्वतःच्या मर्यादा ओळखून आपण किती पुढे जाऊ शकतो हे माहीत असणे आवश्यक आहे. तर या संपूर्ण प्रक्रियेमध्ये वस्तुनिष्ठ राहा. परंतु, एकदा निर्णय घेतल्यानंतर स्वप्न साध्य करण्यासाठी लक्ष केंद्रित करा आणि प्रेरित राहा. लक्षात ठेवा, करिअरसाठी योग्य नियोजन, सतत प्रयत्न आणि शिकण्याची वृत्ती असणे आवश्यक आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2TzAmrw
via IFTTT

Post a Comment

0 Comments