SSC Result 2021: मूल्यमापनाची प्रक्रिया 'हँग'; २३ जूनपासून पुन्हा सुरू

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद दहावीच्या शाळास्तरावर प्रमाणित केलेला निकाल मंडळाच्या संगणकीय प्रणालीमध्ये भरण्याची प्रक्रिया सोमवारी सुरू होऊ शकली नाही. नमनालाच खोडा आल्याने वेळापत्रक पुढे ढकलण्याची वेळ माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळावर आली आहे. संगणकीय प्रणालीत दुरूस्तीमुळे २३ जूनपासून प्रक्रिया सुरू होईल, असे सांगण्यात येते. तर माहिती भरून देण्याच्या पद्धतीत काही बदल केले जाऊ शकतात, असेही सूत्रांनी सांगितले. या बदलामुळे पुढील वेळापत्रकातही बदल होण्याची शक्यता आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीसाठी मूल्यमापन कार्यपद्धतीचा तपशील व वेळापत्रक ९ जून रोजी जाहीर करण्यात आला. करोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत असल्याने दहावी, बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली. दहावी मूल्यमापनाची प्रक्रिया सुरू आहे. त्यात विषय शिक्षक मूल्यांकन, विषयनिहाय गुणतक्ते, निकाल शाळा समितीकडे सादर करण्यास २० जूनपर्यंत मुदत होती. त्यासह निकाल समितीने निकालाचे परीक्षण, नियमन करून प्रमाणित करण्याची प्रक्रियाही सुरू आहे. निकाल प्रमाणित करून मंडळाच्या संगणकीय प्रणालीमध्ये भरण्याची प्रक्रिया सोमवार २१ जूनपासून सुरू होणार होती. मंडळाने वेळापत्रकात स्पष्ट केले होते. परंतु सोमवारी प्रक्रियाच सुरू होऊ शकली नाही. अनेक शिक्षक, मुख्याध्यापक, निकाल समितीचे प्रक्रियेकडे लक्ष होते. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे संगणकीय प्रणालीमध्ये भरण्याची प्रक्रिया सुरू सोमवारी होऊ शकत नाही. दुपारी प्रक्रिया २३ जूनला सुरू होईल असे मंडळाकडून कळविण्यात आले. त्याला औरंगाबाद विभागीय मंडळाच्या सचिवांनीही दुजोरा दिला. त्यामुळे आता ही प्रक्रिया बुधवारपासून सुरू होईल असे सांगण्यात येते. शिक्षण मंडळाचे सर्व्हरमध्ये अडचणी मंडळातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व्हर सेटिंगमध्ये अडचणी असल्याने प्रणाली सुरू होऊ शकलेली नाही. त्यात काही दुरूस्ती केली जात आहे. विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता निकाल भरताना धांदल उडण्याची शक्यता आहे. राज्यात दहावीची १७ लाखांवर विद्यार्थी संख्या आहे. मराठवाड्यात औरंगाबाद विभागात १ लाख ८५ हजार २२५ तर लातूर विभागात १ लाख १० हजार ३५४ असे एकूण २ लाख ९५ हजार ५७९ दहावीचे विद्यार्थी आहेत. एकूण शाळांची संख्या ४ हजार ३४५ आहे. मंडळाच्या कारभारावरही मुख्याध्यापक नाराजी व्यक्त करत आहेत. प्रमाणित केलेल्या निकालानुसार विद्यार्थ्यांचे गुण मंडळाच्या संगणकीय प्रणालीमध्ये भरण्याचे वेळापत्रक मंडळानेच निश्चित केले. अशावेळी प्रणालीतील काही दोष आहेत का, याबाबत वेळापत्रक जाहीर होण्यापूर्वीच खातरजमा मंडळाने करायला हवी होती, अशी शिक्षक, मुख्याध्यापकांमध्ये चर्चा आहे. शाळांना दिलासा दहावीचा मूल्यांकनात पहिला टप्पा विषय शिक्षकांचे मूल्यांकन, विषयनिहाय गुणतक्त्यांमध्ये निकाल तयार करून शाळा समितीकडे सादर करायचा आहे. २० जूनपर्यंत त्यासाठी मुदत होती. परंतु अनेक शाळांमध्ये त्याची प्रक्रिया अपूर्ण असल्याचे सांगण्यात येते. सत्र, सराव परीक्षा न झालेल्या शाळांनी गृहपाठ, स्वाध्यायच्या मार्फत मूल्यांकनाची प्रक्रिया सुरू केली. त्यात विद्यार्थ्यांना गृहपाठ, स्वाध्यायसाठी टप्प्या टप्प्याने बोलावले जात आहे. काही विद्यार्थ्यांकडून वर्षभरातील त्यांनी केलेल्या अभ्यासाच्या विषयनिहाय वह्या जमा केल्या जात आहेत. त्यानंतर गुणांकनाची प्रक्रिया केली जाणार आहे. त्यामुळे प्रक्रियेला विलंब लागत असल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले. मूल्यमापनाचे वेळापत्रक मूल्यांकन, विषयनिहाय गुणतक्ते, निकाल शाळा समितीकडे सादर ११ ते २० जून निकाल समितीने परीक्षण, नियमन करून प्रमाणित करणे १२ ते २४ जून प्रमाणित केलेल्या निकालानुसार विद्यार्थ्यांचे गुण मंडळाच्या संगणकीय प्रणालीमध्ये भरणे २१ ते ३० जून विद्यार्थ्यांचे निकाल, अनुषंगिक स्वाक्षरी प्रपत्रे मंडळात जमा करणे २५ ते ३० जून परीक्षा निकालाबाबत विभागीय मंडळ, राज्य मंडळ स्तरावरील प्रक्रिया ३ जुलै प्रमाणित केलेल्या निकालानुसार विद्यार्थ्यांचे गुण मंडळाच्या संगणकीय प्रणालीमध्ये भरण्याची प्रक्रिया २३ जूनपासून सुरू होणार आहे. त्याबाबत मंडळाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. - राजेंद्र पाटील, विभागीय सहसचिव, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, औरंगाबाद


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3wNvRrY
via IFTTT

Post a Comment

0 Comments