दहावीच्या गुणपत्रिका नऊ ऑगस्टपासून मिळणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे 'महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता दहावीच्या गुणपत्रिका विद्यार्थ्यांना सोमवारी ९ ऑगस्टपासून देण्यात येणार आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर ठरावीक दिवशी गुणपत्रिका नेण्याची सक्ती विद्यार्थ्यांवर करू नये,' अशी सूचना राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केली आहे. दहावीचा निकाल ऑनलाइन पद्धतीने जाहीर झाल्यानंतर गुणपत्रिका केव्हा मिळणार, याबाबत सातत्याने विचारणा होते. त्यातच यंदा अंतर्गत मूल्यांकनामुळे निकालात उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण ९९.९५ असून, अनेकांना चांगले गुण मिळाले आहे. त्यामुळे यंदा गुणपत्रिकेबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता होती. त्यानुसार दहावीच्या गुणपत्रिका वितरित करण्याबाबतचे परिपत्रक डॉ. भोसले यांनी प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना ९ ऑगस्टपासून गुणपत्रिका मिळणार आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत प्रत्येक वितरण केंद्राला जोडलेल्या शाळांची संख्या लक्षात घेऊन जास्त वितरण केंद्रे निर्माण करणे किंवा त्याच वितरण केंद्रावर सुरक्षित अंतर ठेवून वितरण खिडक्यांची संख्या वाढवून गुणपत्रिका वितरित कराव्यात. विभागीय मंडळाकडून शाळांना ७ ऑगस्ट आणि ९ ऑगस्टला गुणपत्रिका वितरित करण्यासाठी दिल्या जातील. त्यानंतर शाळांनी ९ ऑगस्टला दुपारी तीन वाजतापासून विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार नियमांचे पालन करुन गुणपत्रिक द्याव्यात. ठरावीक दिवशीच शाळेत येऊन गुणपत्रिका घेण्याची सक्ती विद्यार्थ्यांना करण्यात येऊ नये, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. पालक-विद्यार्थ्यांची एकाच वेळी गर्दी न होण्याबाबत शाळांनी नियोजन करावे. त्याचप्रमाणे गुणपत्रिका वितरणासाठी केंद्रावर स्थायी लिपीक व शिपाई पाठवावा, अशा सूचना डॉ. भोसले यांनी विभागीय मंडळाच्या सचिवांना दिल्या आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3fgz2BM
via IFTTT

Post a Comment

0 Comments