MPSC Bharti: राज्य लोकसेवा आयोगात सहाय्यक आयुक्त पदाची भरती

प्रा. संजय मोरे महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे सहाय्यक आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका, वरिष्ठ सेवा गट-अ या पदासाठी होणारी १६ पदांची भरती होणार आहे. इतक्या जास्त पदांची भरती पहिल्यांदाच होत आहे. हे पद पूर्णपणे टेक्निकल असले तरीही वॉर्ड ऑफिसर हा जनरलिस्ट म्हणून काम करत असतो. जनरलिस्ट म्हणून काम करत असताना त्या अधिकाऱ्याची निवड करताना उमेदवाराचे तांत्रिक ज्ञान किती आहे, हे तपासून त्यांच्यामध्ये असलेलं व्यवस्थापन व तार्किक कौशल्य परीक्षेद्वारे तपासलं जातं. आजच्या लेखामध्ये या भरती बाबतची माहिती घेऊ या... ० बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील साहाय्यक आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका, महापालिका वरिष्ठ सेवा, गट-अ या १६ पदांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती होईल. (अजा-४, अज-१, भज(ड)-१, इडब्ल्यूएस-२, इमाव-३, खुला-५, एकूण १६ पदं). यातील ३० टक्के पदं महिलांसाठी राखीव आहेत. (अजा-१, इमाव-१, इडब्ल्यूएस-१, खुला-२, एकूण ५ पदं). ० पात्रता- आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, लॉ, मेडिसिन किंवा इंजिनीअरिंग पदवी किंवा समतूल्य पदवी उत्तीर्ण. ० अनुभव- किमान पाच वर्षांचा अॅयडमिनिस्ट्रेटिव्ह, एक्झिक्युटिव्ह किंवा सुपरवायझरी या पदावरील कामाचा अनुभव आवश्यक. (सशस्त्र दलातील माजी कमिशन्ड ऑफिसर्सचा अनुभव ग्राह्य धरला जाईल) ० वयोमर्यादा- ४० वर्षांपर्यंत. (मागासवर्गीय- ४५ वर्षांपर्यंत; प्राविण्य प्राप्त खेळाडू- अमागास- ४३ वर्षांपर्यंत; दिव्यांग- ४५ वर्षांपर्यंत) (बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उमेदवारांना वयोमर्यादा शिथिलक्षम राहील.) ० निवडप्रक्रिया- वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची २०० गुणांची लेखी परीक्षा (कालावधी १ तास) आणि मुलाखत (५० गुणांची). प्रत्येक ४ चुकीच्या उत्तरांमागे एका प्रश्नाचे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतील. लेखी परीक्षेचा निकाल प्रसिद्ध करण्यात येईल. लेखी परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गाच्या उमेदवारास ३५ टक्के आणि आरक्षित प्रवर्गातील उमेदवारास ३० टक्के गुण, दिव्यांग उमेदवारास २० टक्के गुण मिळवणं आवश्यक राहील. अंतिम निवडीकरिता मुलाखतीमध्ये किमान ४१ टक्के गुण मिळवणं आवश्यक राहील. अंतिम गुणवत्ता यादी लेखी परीक्षेतील आणि मुलाखतीतील एकत्रित गुणांवर आधारित असेल. ऑनलाइन पद्धतीनं अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या https://ift.tt/3oZLYzp आणि https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी secretary@mpsc.gov.in या ई-मेल आयडीवर संपर्क साधू शकता. ऑनलाइन अर्ज https://ift.tt/3oZLYzp या संकेतस्थळावर २६ जुलै, २०२१पर्यंत करावेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3qPxdAd
via IFTTT

Post a Comment

0 Comments