होमिओपॅथी पदवी अभ्यासक्रमाच्या उत्तीर्णतेसाठी चार संधी!

म. टा. प्रतिनिधी, नाशिक होमिओपॅथी पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक वर्ष जास्तीत जास्त चार प्रयत्नात उत्तीर्ण होण्याची सूचना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने केल्या आहेत. एक वर्ष चार प्रयत्नातही उत्तीर्ण न झालेल्या विद्यार्थ्यांचा परीक्षा अर्ज विद्यापीठाकडे न पाठवता, त्यांना पुन्हा एक वर्ष प्रशिक्षण देण्याची सूचना संबंधित महाविद्यालयांना देण्यात आली आहे. केंद्रीय होमिओपॅथी कौन्सिलमार्फत होमिओपॅथी पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी नियम लागू झाले आहेत. चार वर्षांचा हा पदवी अभ्यासक्रम ११ वर्षांमध्ये पूर्ण होणे आवश्यक असून, प्रत्येक वर्ष जास्तीत जास्त चार प्रयत्नांमध्ये पूर्ण करणे बंधनकारक आहे. आरोग्य विद्यापीठामार्फत प्रत्येक वर्षी हिवाळी व उन्हाळी परीक्षांदरम्यान दोन वेळा विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची संधी मिळते. तरीही काही विद्यार्थी चार प्रयत्नांमध्ये उत्तीर्ण न झाल्याचे निदर्शनास येते. चार प्रयत्नातही उत्तीर्ण न झालेल्या विद्यार्थ्यांचा पुढील परीक्षेसाठीचा अर्ज विद्यापीठाकडे न पाठविण्याची सूचना विद्यापीठामार्फत संबंधित महाविद्यालयांना करण्यात आली आहे. तसेच या विद्यार्थ्यांना वर्षभर प्रशिक्षण देऊन त्यानंतर परीक्षा अर्ज भरून घेण्याची सूचना विद्यापीठाने दिली आहे. याबाबत विद्यापीठाच्या परीक्षा विभागामार्फत महाविद्यालयांना काही आदेशही देण्यात आले आहेत. राज्यभरातील विद्यापीठाशी संलग्न होमिओपॅथी महाविद्यालयांकडून आरोग्य विद्यापीठामार्फत विद्यार्थ्यांची माहिती मागविण्यात आली आहे. प्रवेशित विद्यार्थी, त्याने प्रत्येक वर्षी परीक्षेसाठी घेतलेल्या संधी आणि चारपेक्षा अधिकवेळा परीक्षेची संधी दिलेली असल्यास त्याबाबतचे स्पष्टीकरण महाविद्यालयाकडे मागितले आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाची कालगणना करणे, त्यांच्याकडून वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करण्याबाबत हमीपत्र भरून घेणे ही जबाबदारी महाविद्यालयांचीच असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे एक वर्ष चार प्रयत्नान उत्तीर्ण न झालेल्या विद्यार्थ्यांना आता पुढील परीक्षा देण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे. ...अन्यथा कडक कारवाई केंद्रीय होमिओपॅथी परिषदेच्या सूचनेचे उल्लंघन करून काही महाविद्यालये कालमर्यादेचा नियम पाळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. अशा महाविद्यालयांवर कडक कारवाई केली जाणार असून, त्यानंतरच्या परिणामांना महाविद्यालयेच जबाबदार असतील, असा इशारा विद्यापीठाने दिला आहे. अभ्यासक्रमाची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठीच होमिओपॅथी परिषदेमार्फत हा नियम लागू करण्यात आल्याची माहिती विद्यापीठामार्फत देण्यात आली. हेही वाचा:


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/39OcBk8
via IFTTT

Post a Comment

0 Comments