शाळेच्या पहिल्या दिवसाची आठवण 'येथे' पाठवा, शिक्षण विभागाचे आवाहन

2021: दीड वर्षाच्या कालावधीनंतर राज्यातील शाळांना प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. अनेक शाळांमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत केले. शाळांकडून करोना प्रतिबंध नियमांचे काटेकोर पालन केले जात आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. नुकतीच त्यांनी सायनच्या डी. एस. स्कुल या शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. दरम्यान शालेय शिक्षणविभागातर्फे विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवसाचा अनुभव पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना आपले अनुभव पाठविण्याचे आवाहन केले आहे. शाळेतल्या पहिला दिवस कायम स्मरणात राहिल, असा घालवा. विशेषतः दीर्घ कालावधीनंतर उगवलेला हा दिवस उत्साहात साजरा करा असे वर्षा गायकवाड यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. तसेच पहिल्या दिवसाचे उत्तम अनुभव शेअर करा.शाळेतील तुमचे फोटो,व्हिडिओ,गाणी,कविता @thxteacher या ट्विटर खात्याला टॅग करून पोस्ट करा असे आवाहन त्यांनी केले आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन, शहरातील अनेक शाळांनी स्वखर्चातून विद्यार्थ्यांना सॅनिटायझर, मास्क मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे स्वच्छतागृहांची साफसफाई करण्यात आली असून, त्यामध्ये साबण आणि पाणी २४ तास उपलब्ध राहील, याची काळजी घेण्यात आली आहे. वर्गखोल्यांच्या देखभाल-दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. एका बाकावर एक जण बसेल, याची काळजी घेण्यात येईल. वर्गात अधिकाधिक हवा खेळती राहील, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. शाळांसाठी महत्वाचे निर्देश शाळा सुरु होताना टास्क फोर्सने दिलेल्या सुचनांचे पालन करणे शाळांसाठी बंधनकारक असणार आहे. प्रत्येक शाळेने शक्य असल्यास हेल्थ क्लिनिक सुरु करावे. नियमितपण विद्यार्थ्यांचे तापमान तपासावे अशी सूचना करण्यात आली आहे. मुलांनी शाळेत पायी येण्यास शिक्षकांनी प्रोत्साहित करावे. ज्या शाळांमध्ये स्कूलबस किंवा खासगी वाहनांनी विद्यार्थी येतात तिथे एका सीटवर एक विद्यार्थी अशी आसन व्यवस्था असावी असे निर्देश देण्यात आले आहेत. जेवण आणि इतर बाबी केल्यानंतर साबण किंवा सॅनिटायझरने हात धुण्याबाबत विद्यार्थ्यांना सतत सूचना द्याव्यात. तसेच सद्यस्थितीत मैदानी खेळ घेऊ नयेत अशा सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत. सरसकट शाळा सुरु करण्याची मागणी शहरी भागात केवळ आठवी ते बारावी आणि ग्रामीण भागात पाचवी ते बारावी, असे वर्गीकरण न करता सरसकट पहिलीपासून शाळा सुरू कराव्यात, अशी मागणी शिक्षक आणि मुख्याध्यापकांकडून केली जात आहे. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे शाळा सुरू नसल्याने मोठे नुकसान होत असून, या विद्यार्थ्यांनाही शाळेत जाण्याची संधी मिळायला हवी, अशी भूमिका आता शिक्षण क्षेत्रातून मांडण्यात आली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3FemZA6
via IFTTT

Post a Comment

0 Comments