अभ्यासक्रम वेगळा 'सीईटी' भलतीच! COEP कॉलेजातील प्रकार

म. टा. प्रतिनिधी, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात (COEP) सुरू झालेल्या 'बी. प्लॅनिंग' या अभ्यासक्रमाला हॉटेल मॅनेजमेंटच्या सीईटीच्या आधारे प्रवेश दिला जात असल्याचा विचित्र प्रकार समोर आला आहे. दोन्ही अभ्यासक्रमांचा एकमेकांशी काहीही संबंध नसताना दोन वर्षांपासून अशाच प्रकारे प्रवेश दिले जात आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (AICTE) सूचनेनुसारच हे प्रवेश दिले जात असल्याचा दावा सीईटी सेल आणि 'सीओईपी'ने केला आहे. राज्यात केवळ 'सीओईपी'मध्ये गेल्या दोन वर्षांपासून अभियांत्रिकीबरोबरच 'बी. प्लॅनिंग' हा पदवी अभ्यासक्रम घेतला जातो. दर वर्षी या अभ्यासक्रमाला ६० विद्यार्थी प्रवेश घेतात. हे प्रवेश हॉटेल मॅनेजमेंटच्या 'सीईटी'च्या आधारावर होत असल्याचे खासदार व 'आयसीसीआर'चे अध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी राज्याच्या सीईटी सेल व तंत्रशिक्षण संचालनालयाकडे तक्रार केली आहे. परंतु, यामागची वस्तुस्थिती पाहिली; तर प्लॅनिंगचे प्रवेश हॉटेल मॅनेजमेंटच्या सीईटीद्वारे घेण्याचा निर्णय 'एआयसीटीई'द्वारे घेण्यात आला आहे. गेल्या वर्षीदेखील 'सीओईपी'त 'प्लॅनिंग' या अभ्यासक्रमासाठी हॉटेल मॅनेजमेंटच्या सीईटीद्वारेच प्रवेश देण्यात आले होते. या वेळीही सीईटी सेलने 'सीओईपी'ला याच परीक्षेच्या आधारे गुणवत्ता यादी जाहीर करण्यास सांगितले आहे. हॉटेल मॅनेजमेंटची सीईटी दिलेले जे विद्यार्थी हा अभ्यासक्रम शिकण्यास उत्सुक आहेत, अशांना गुणवत्तेच्या आधारावर प्रवेश दिला जाणार आहे. खासदार सहस्रबुद्धे यांनी मात्र याला विरोध केला असून जेईई-प्लॅनिंग आणि अभियांत्रिकीची सीईटी दिलेले विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी पात्र करावेत, अशी मागणी केली आहे. 'सीओईपी'कडे विद्यार्थ्यांच्या अर्जांची छाननी करून केवळ गुणवत्ता यादी जाहीर करणे, एवढ्यापुरतेच अधिकार आहेत. बी. प्लॅनिंग या अभ्यासक्रमासाठी होणारे प्रवेश 'एआयसीटीई'च्या सूचनांनुसार होतात. त्यामुळे हॉटेल मॅनेजमेंटच्या सीईटीद्वारे या अभ्यासक्रमाला प्रवेश देणे, हा सीओईपीचा निर्णय नाही. - बी. बी. आहुजा, संचालक, सीओईपी 'बी. प्लॅनिंग' या अभ्यासक्रमाला हॉटेल मॅनेजमेंट सीईटीद्वारे प्रवेश देण्यात यावेत, असा उल्लेख 'एआयसीटीई'च्या नियमांमध्ये आहे. त्यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणेच आम्ही प्रवेश प्रक्रिया राबवतो. हा निर्णय सीईटी सेलने घेतलेला नसून याबाबतची अधिक चौकशी एआयसीटीईकडे करायला हवी. - रवींद्र जगताप, संचालक, सीईटी सेल 'बी. प्लॅनिंग'चे प्रवेश जेईई प्लॅनिंग किंवा अभियांत्रिकीच्या 'सीईटी'च्या आधारे होणे अपेक्षित आहे. असे असतानाही ते हॉटेल मॅनेजमेंटच्या 'सीईटी'द्वारे का घेतले जातात, हे कळायला मार्ग नाही. अनेक पालक आणि विद्यार्थ्यांनी माझ्याकडे यासंदर्भात तक्रारी केल्याने हा मुद्दा निदर्शनास आणून दिला आहे. - विनय सहस्रबुद्धे, खासदार


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3rurWAi
via IFTTT

Post a Comment

0 Comments