Also visit www.atgnews.com
नवी मुंबईतील शाळेत १८ विद्यार्थी करोनाबाधित, पालिकेसह पालकांची चिंता वाढली
नवी मुंबई : घणसोली येथील शेतकरी शिक्षण संस्थेतील शाळेतील १८ विद्यार्थी करोनाबाधित आढळल्याने नवी मुंबई महापालिकेसह पालकांचीही चिंता वाढली आहे. महापालिकेने या प्रकरणी गांभीर्याने कार्यवाही करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार शाळेतील इतर विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांची तपासणी सुरू केली आहे. तर, काही विद्यार्थ्यांचे नमुने ओमायक्रॉनच्या तपासणीसाठी जिनोम सिक्वेन्सिंगला पाठवले आहेत. त्यामुळे त्यांचा अहवाल काय येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर पाल्यांना शाळेत पाठवू इच्छिणाऱ्या पालकांचीही चिंता वाढली आहे. घणसोली येथील शेतकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमिक व कनिष्ठ विद्यालयातील एका विद्यार्थ्याचे पालक कतार येथून प्रवास करून आल्यानंतर या पालक व त्यांच्या कुटुंबीयांची करोना तपासणी केली असता त्या पालकांचा अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र त्यांच्या मुलाचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मुलाच्या पालकाचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांच्या मुलाला नेमकी कुठून लागण झाली, याबाबत सर्व शक्यता पडताळून घेण्यात येत असून या विद्यार्थ्याचा नमुना जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठविण्यात आल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. हा विद्यार्थी ज्या शाळेत शिक्षण घेत होता, त्या शाळेतील एकूण ११४९ जणांची तपासणी करण्यात आली आहे. यात शिक्षक, इतर कर्मचारी, विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. त्यामध्ये १८ करोनाबाधित विद्यार्थ्यांना कोणतीही लक्षणे नसली तरी वाशी येथील महापालिकेच्या सिडको उपचार केंद्रात ठेवण्यात आले आहे. या सर्व विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्यांची तसेच त्यांच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तींचीही करोना तपासणी करण्यात आली आहे. तसेच, उर्वरित मुलांची व त्यांच्या कुटुंबीयांची घरी जाऊन चाचणी केली जात आहे. शाळा व शाळेभोवतालच्या परिसराचे निर्जुंतकीकरण केले आहे. तसेच, ही शाळा २६ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असून २७ डिसेंबर रोजी शाळा सुरू करण्यापूर्वी करोना प्रतिबंधात्मक उपायोजनांची खातरजमा करण्याचे आदेशही संस्थेला देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व शाळांमध्ये करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबत संपूर्ण दक्षता घ्यावी, असे आदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निर्देशांनुसार शिक्षण विभागाने दिले आहेत. मात्र असे असले तरी काही शाळांमध्ये करोना नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात असल्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे. एका बाकावर दोन विद्यार्थी आठवी ते दहावीचे वर्ग आधीपासूनच सुरू झाले आहेत. शिक्षण विभागाच्या आदेशानुसार, एका बाकावर एक विद्यार्थी या प्रमाणे शिकवले जात आहे. त्यामुळे एक दिवस मुलांची आणि दुसऱ्या दिवशी मुलींची अशा प्रकारे वर्ग भरवले जात आहेत. मात्र आता पाचवी ते सातवीचेही वर्ग सुरू होत असल्याने काही शाळांना या मुलांचे वेळापत्रक नियमाप्रमाणे जुळवण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे काही शाळांनी एका बाकावर दोन विद्यार्थ्यांना बसविण्यास सुरुवात केली आहे. कोपर खैरणेमधील शाळेत हा धक्कादायक प्रकार सुरू आहे. यामुळे काही पालकांनी शाळेला याबाबत विचारणा केली असता, एका दिवसाआंड शाळा घेऊन मुलांचा अभ्यास पूर्ण होत नसल्याचेच कारण त्यांनी दिले आहे. अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करण्यासाठी एकाच दिवशी विद्यार्थ्यांना बोलावले जात असल्याचे उत्तर त्यांच्याकडून मिळाले आहे. मात्र शाळेच्या या भूमिकेमुळे करोना सुरक्षानियम पायदळी तुडवले जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महापालिकेच्या शिक्षण विभागाने शाळांवर लक्ष ठेवण्याचीही गरज काही पालकांकडून व्यक्त होत आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3EdJeo0
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments