पालघर जिल्ह्यातल्या आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा २७ जानेवारीपासून

म. टा. वृत्तसेवा, पालघर पालघर जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या शाळातील इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा २७ जानेवारीपासून सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पालघर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीनी दिले आहेत. इयत्ता पहिली ते सातवीच्या शाळा कोविड-१९च्या परिस्थितीनुरूप सुरू करण्यात येणार असल्याचे आपत्ती विभागाने म्हटले आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर २० दिवसांपूर्वी राज्यातील केजीपासून बारावीपर्यंतच्या सर्व शाळा व कॉलेजेदेखील बंद करण्याचे निर्देश राज्याच्या शिक्षण विभागाने दिले होते. त्यानंतर करोनाच्या तिसऱ्या लाटेचा संसर्ग नियंत्रणात येऊ लागल्याने शाळा पूर्ववत सुरू करण्याचे आदेश शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी गुरुवारी दिले. बालवाडी ते बारावीपर्यंतचे संपूर्ण शिक्षण सुरू होणार असल्याचे म्हटले असले, तरी प्रत्यक्षात स्थानिक पातळीवरील परिस्थितीनुसार जिल्हा प्रशासनाला योग्य ते निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यानुसार, पालघर जिल्ह्यात या सर्व शाळा सुरू न होता, केवळ आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ६५० शाळांमधील ७२ हजार ४७५ विद्यार्थी २७ जानेवारीपासून शाळेत उपस्थित राहतील, असा अंदाज आहे. शाळेत येण्यासाठी पालकांची संमती आवश्यक आहे. संस्थांमार्फत चालविल्या जाणाऱ्या शाळा सुरू करण्याबाबत अद्यापही संस्थाचालकांचा निर्णय झाला नसल्याने या शाळा नेमक्या केव्हा सुरू होणार, याबाबत अनिश्चितता आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3H44UVS
via IFTTT

Post a Comment

0 Comments