Also visit www.atgnews.com
जळाल्या त्या प्रश्नपत्रिका बारावीच्या मराठी विषयाच्या; परीक्षा नियोजित वेळेतच
म.टा. प्रतिनिधी, नगर पुणे-नाशिक महामार्गावर संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटात एका धावत्या ट्रकला आग लागली. त्यामध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिका (12th Exam Question Papers) होत्या. त्या जळून खाक झाल्या आहेत. या माहितीला पुणे विभागीय मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दुजोरा दिला; मात्र, 'परीक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणे चार मार्चपासून सुरू होईल, यात काहीही अडचण येणार नाही,' अशी माहितीही त्यांनी दिली. हा अपघात बुधवारी पहाटे झाला. मध्य प्रदेशातून पुणे विभागीय मंडळाचे छापील साहित्य घेऊन येणाऱ्या ट्रकला (क्र. एम. पी. ३६ एच. ०७९५) पाठीमागील बाजूने आग लागली. हे लक्षात आल्यानंतर चालक व त्याच्या सहायकाने ट्रक थांबवून आग अटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. संगमनेरमधील अग्निशामक दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या वाहनात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची गोपनीय कागदपत्रे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क केला. त्यानुसार पुणे विभागीय मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी, सचिव अशोक भोसले, विभागीय सचिव अनुराधा ओक, सहायक सचिव पोपट महाजन यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. जळालेल्या कागदपत्रांमध्ये बारावीच्या चार मार्च रोजी होणाऱ्या मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिका असल्याचे सांगण्यात आले. या माहितीला अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला. मध्य प्रदेशातून हे साहित्य छापून आणण्यात येत होते. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने यांनी दिली. आगीच्या कारणासंबंधी पोलिस अधिक तपास करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. आग आटोक्यात आणल्यानंतर जळालेली कागदपत्रे दुसऱ्या वाहनात भरून नेण्यात आली. घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुनील पाटील, अंमलदार कैलास देशमुख घटनास्थळी गेले. संगमनेर नगर परिषद आणि संगमनेर साखर कारखान्याच्या अग्निशामक पथकांनी आग अटोक्यात आणली. महामार्ग विभागाचे पोलिस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी आले. नाशिक-पुणे वाहतूक काही काळासाठी जुन्या घाटातून वळविण्यात आली होती.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/5tvua6O
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments