शाळांमधील 'बाउन्सर्स'चा मुद्दा आज निकाली?

म. टा. प्रतिनिधी, विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणाऱ्या शाळांमध्ये पालक, विद्यार्थी संघटनांची अडवणूक करण्यासाठी सर्रास नेमल्या जाणाऱ्या 'बाउन्सर्स'चा मुद्दा आज निकाली लागण्याची शक्यता आहे. शाळेत बाउन्सर्स नियुक्त करावेत की नाहीत, यासंदर्भात विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शिक्षण संचालक व उपसंचालकांच्या बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत सर्व राज्यासाठी निर्णय होण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी पुण्यातील क्लाइन मेमोरियल स्कूलमध्ये नेमण्यात आलेल्या बाउन्सर्सने पालकांना मारहाण करण्याचा प्रकार घडला होता. या प्रकाराची राज्यभर चर्चा झाल्यानंतर हे प्रकरण शिक्षण उपसंचालक औदुंबर उकीरडे यांच्याकडे गेले आणि त्यांनी घडलेल्या प्रकारासंदर्भात सविस्तर अहवाल सादर केला होता. या अहवालामध्ये क्लाइन मेमोरियल स्कूलची मान्यता रद्द करण्याची शिफारसही करण्यात आली होती. या शिवाय नेमले जाऊ नयेत, असा प्रस्तावही शिक्षण विभागाकडे पाठवण्यात आला होता. याच प्रस्तावावर आज (१५ मार्च) चर्चा केली जाणार असून त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. शाळेतील पालक, विद्यार्थ्यांच्या हितासाठी काम करणाऱ्या संघटना यांना शाळेच्या आवारात येण्यास मज्जाव केला जाऊ नये. पालक किंवा संघटनांचे प्रतिनिधी शालेय व्यवस्थापनाशी शांततापूर्ण पद्धतीने चर्चा करत असतील; तर त्यांना हटकण्यात येऊ नये, अशी मागणी विद्यार्थी संघटनांकडून केली जात आहे. या मागणीवरही या बैठकीत चर्चा केली जाणार असून शाळेच्या आवारात पालकांना प्रवेश देण्यास मज्जाव केला जाऊ नये, यावरही बैठकीत ऊहापोह केला जाणार आहे. बाउन्सर्सप्रकरणी आज बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला विधानपरिषदेच्या उपसभापती उपस्थित राहणार आहेत. शाळांमध्ये बाउन्सर्स असावेत का, या विषयावर चर्चा करून निर्णय होण्याची शक्यता आहे. हा निर्णय संपूर्ण राज्यामध्ये लागू असेल. - औदुंबर उकीरडे, शिक्षण उपसंचालक 'सुरक्षारक्षकांची मुजोरीही थांबवा' अनेक शाळांमध्ये बाउन्सर्स नसले, तरी त्या शाळांचे सुरक्षारक्षक एखाद्या बाउन्सर्सप्रमाणेच वागतात, असे चित्र अनेकदा दिसून आले आहे. शांततेच्या मार्गाने शाळांमध्ये प्रवेश करणाऱ्या पालक, विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींना अनेकदा सुरक्षारक्षकांकडून दमदाटी आणि अडवणूक केली जाते. शाळा हे सार्वजनिक ठिकाण असून कोणाच्याही मालकीची खासगी जागा नाही. यामुळे बाउन्सर्सप्रमाणेच सुरक्षारक्षकांच्या वर्तनासंदर्भातही नियमावली असावी, अशी मागणी पालक संघटनांनी केली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/FLalqGM
via IFTTT

Post a Comment

0 Comments