सीबीएसईच्या अध्यक्षांचं मुलांना भावूक पत्र...

नवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या परीक्षेमुळे विद्यार्थीच नव्हे तर आईवडिलही तणावात असतात. हा तणाव दूर करण्यासाठी बोर्डाच्या अध्यक्ष अनीता करवल गेली तीन वर्षे विद्यार्थ्यांना उद्देशून एक पत्र लिहित आल्या आहेत. यंदाही त्यांनी पत्र लिहीलंय. त्यांनी म्हटलंय - 'मुलांनो, आयुष्यात काहाही करा पण इतिहास बनू नका.' काय म्हटलंय सीबीएसई बोर्डाच्या अध्यक्षांनी पत्रात?...वाचा प्रिय मुलांनो, शाळा म्हणजे केवळ बोर्डाच्या परीक्षा नव्हे. आज मी मागे वळून पहाते, विचार करते की शाळेत शिकलेली कोणती गोष्ट मी घरी आणू शकले. मला आठवते - पिकनीक, वार्षिक मेळावे, खेळ, मित्र-मैत्रीणी, त्यांच्यासोबत केलेली मस्ती, हसणं-रडणं, शेअरिंग आणि केअरिंग. पण अभ्यासाच्या बाबतीत सगळ्या आठवणी धूसर आहेत. जसं - इतिहासात तेव्हा ढीगभर तारखा मला लक्षात होत्या, आता नाहीत. मी माझ्या मित्रांना सांगू इच्छिते की आयुष्यात काही करा, पण इतिहास बनू नका. पुढची पिढी तुम्हाला माफ करणार नाही. गणितात माझे हाल 'Alice in Wonderland' सारखे होते. रसायन शास्त्र माझ्यासाठी अनेक अक्षरं आणि अरबी अंकांचं मिश्रण होतं. पण जीवशास्त्र विषय मला आवडायचा. हा विषय मला इतका आवडायचा की मी तांबड्या पेशींवर ऑटोबायोग्रफीच लिहायची. तो मला आर्टरुमसारखा होता. इतर अॅक्टिव्हिटिजमध्ये मी जास्त हुशार होते. मला रंगांशी खेळायला आवडायचं. स्टेजवर लांबलचक डॉयलॉग मी लक्षात ठेवू शकायचे. पण मला बोर्डात विचारलेले प्रश्न आठवत नाहीत. परीक्षा कशी गेली ते आठवत नाही. मी तुम्हाला हे यासाठी सांगतेय की तुम्ही हे लक्षात घ्या की शाळेतल्या प्रत्येक विषयात उत्तम कामगिरी करूनच आपण आयुष्यात यशस्वी होणार आहोत असं नव्हे. विविध विषयांची आपल्याला जाणीव व्हावी यासाठी शाळा असते. हा वेळ हे शिकण्यासाठी असतो की आयुष्यभर कसं शिकत राहायचं. जीवनाची मूल्ये आणि कौशल्य शिकण्याचा हा काळ असतो. तुम्ही २१ व्या शतकातली मुलं आहात. तुम्हाला नोकरी देणारे कदाचित तुमचे शाळेतले गुण बघणार नाहीत, पण तुम्ही किती क्रिएटिव्ह आहात हे पाहतील. तुम्ही मेहनत करण्यास सक्षम आहात का ते पाहतील. तुम्हाला वाटो न वाटो, मला विश्वास आहे की तुमच्या अंगी हे गुण आहेत आणि जोपर्यंत भविष्याचा प्रश्न आहे, तुम्ही परीक्षा आधीच पास झाला आहात. तुम्ही आयुष्यात खूप पायऱ्या चढल्या आहात - रांगत रांगत चालायला शिकलात, अस्पष्ट बोलत स्पष्ट बोलायला शिकलात, मित्र बनवायला शिकलात, अभ्यास, खेळ, चित्र, नृत्य, गाणं, खाणं, इंटरनेट, मोठ्यांचा मान, संस्कृतीची जाण... आणखी खूप काही... या सगळ्यामुळे तुमचं व्यक्तिमत्व उजळून निघालं आहे. परीक्षा या सर्वांमधील एक भाग आहे. तो इतका मोठा नाही, जितकं त्याचं महत्त्व वाढवलं जातं. तुमची क्षमता शोधण्यातल्या प्रवासाचा हा केवळ एक टप्पा आहे. तुम्ही जे शिकलात ते एकाच मान्यतेने सुरू होते - मी हे करू शकतो/शकते. म्हणूनच तुमचं पूर्ण ज्ञान आणि क्षमतेने पुढे जा. चिंता मिटवा, खूप मेहनत करा आणि तुमचं सर्वोत्तम द्या.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Hgvqyj
via IFTTT

Post a Comment

0 Comments