Also visit www.atgnews.com
दहावी परीक्षा: शेवटच्या आठवड्यात उजळणीवर द्या लक्ष!
दहावीच्या परीक्षेच्या अखेरच्या आठवड्यात कशी तयारी करावी आणि परीक्षेला कसे सामोरे जावे, याबाबत टिप्स दिल्या आहेत मागील वर्षी नागपूर बोर्डातून प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या अनुजा सहस्रबुद्धे हिने... दहावीच्या परीक्षेचा अभ्यास वर्षभर केला असेलच. आता अखेरच्या टप्प्यात अभ्यासाच्या चांगल्या उजळणीवर लक्ष द्यायला हवे. माझ्या परीक्षेदरम्यान मी केलेल्या तयारीच्या आधारे काही गोष्टी सुचवू शकते. भाषा विषयांच्या अभ्यासासाठी पाठ्यपुस्तकाबरोबर मी इतर पुस्तकांवरही लक्ष केंद्रित केले होते. याशिवाय सरावासाठी पेपर्सची पुस्तकेही अभ्यासली होती. गणित आणि सायन्स या विषयांसाठी पाठ्यपुस्तकांवर अधिक भर दिला होता. इतिहास आणि भूगोल विषयांमध्येही पाठ्यपुस्तकातून अभ्यास केला होता. महत्वपूर्ण शब्द, घटना, संदर्भ यांचा अभ्यास केला होता. अखेरच्या आठवड्यात उजळणी करताना विद्यार्थ्यांनी विविध प्रश्नांमधील महत्वाचे मुद्दे वाचून काढावेत. धड्याच्या मागे दिलेल्या प्रश्नांची संपूर्ण तयारी आणि उजळणी करावी. प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित पाठ करून जावीत. दिलेल्या नोटस्ची व्यवस्थित उजळणी करावी. इंग्रजी आणि मराठी विषयांच्या अभ्यासासाठी मी अवांतर वाचनावर लक्ष केंद्रित केले होते. शिवाय या भाषांचे पेपर्स सोडविताना आपल्या कल्पकतेलादेखील महत्व असते. विज्ञानात आकृत्यांची पूर्ण तयारी करावी. भूगोलातील नकाशे चांगले अभ्यासून जावे. क्रमाने सोडवा पेपर पेपर सोडवितानादेखील काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. पेपर सोडविताना प्रश्नपत्रिकेत दिलेल्या क्रमानेच प्रश्नांची उत्तरे द्या. कोणताही प्रश्न कुठेही सोडविला, असे शक्यतो करू नये. घाईगडबडीत काही चुका होण्याची शक्यता असते. आकृत्या आणि फ्लो चार्ट प्रश्न सोडवितानाच काढाव्यात. पेपरच्या आधी दहा मिनिटे शांत बसा. रोल नंबर, प्रश्नपत्रिकेवरील माहिती अचूक भरा आणि तपासून घ्या. पेपर लिहिताना वेळेच योग्य व्यवस्थापन करा. काळजीपूर्वक आणि विश्वासाने पेपर सोडविल्यास दहावीच्या परीक्षेत उत्तम यश नक्कीच मिळेल. या गोष्टींची ठेवा आठवण - उत्तरे लिहून झाल्यानंतर त्या खाली लगेच रेषा आखून घ्या. - परीक्षेच्या काळात पुरेशी झोप घ्या. - पेपर लिहिताना काही चुकले तर त्याचा विचार करू नका, पुढील पेपरची तयारी करा. - परीक्षेच्या काळात सगळ्यांवर ताण येतोच, मात्र त्याचे योग्य व्यवस्थापन करा. - व्यवस्थित खाणे-पिणे याकडेही लक्ष द्या.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/32rDsxR
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments