लॉकडाऊन: मंदीतही 'या' कंपन्यांमध्ये नोकऱ्यांची चांदी!

करोना व्हायरसच्या संसर्गामुळे एकीकडे लोकांची आरोग्यस्थिती ढासळली आहे तर दुसरीकडे जगाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. जगापुढच्या या संकटामुळे पगारवाढ, पगार, नोकऱ्यांवर संक्रांत आली आहे. पण दुसरीकडे एक दिलासादायक बाब म्हणजे मार्केटमध्ये अजूनही लोकांना नोकऱ्या दिल्या जात आहे. ET च्या एका अहवालानुसार, गेल्या एक महिन्यात लिंक्डइनसारख्या जॉब प्लॅटफॉर्मवर दोन लाखांहून अधिक नोकऱ्यांसाठी जाहिराती आल्या आहेत. विशेष म्हणजे यापैकी प्रत्येक चारपैकी एक भरतीची जाहिरात गेल्या आठवड्यात पोस्ट झाली आहे. भारतातल्या कंपन्या मंदी असूनही चांगल्या कर्मचाऱ्यांच्या शोधात आहेत, असं चित्र यावरून दिसतं. अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, बायजू आणि ग्रोफर्सने देशभरातील व्हर्टिकल्समध्ये बॅकएंड आणि डिजीटल ऑपरेशन्ससाठी लागणारे कुशल मनुष्यबळ वाढवत आहे. स्टाफिंग फर्म Xpheno नुसार, दहापैकी नऊ नोकऱ्या पूर्णवेळ तर अन्य पार्ट टाइम आणि कंत्राटी आहेत. यापैकी बहुतांश नोकऱ्या एन्ट्री लेव्हलच्या आहेत. म्हणजेच किमान ८० हजार फ्रेशर जॉब्स तयार झाले आहेत. देशातले लाखो लोक सध्या वर्क फ्रॉम होम करत असल्याने आयटी सेक्टरमधील नोकऱ्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. एकूण नोकरींच्या संधींपैकी ७९ टक्के नोकऱ्या आयटी आणि संबंधित डोमेनमध्ये तयार होत आहेत. सॉफ्टवेअर इंजिनीअर्स, प्रोग्रामर्स, फूल स्टॅक डेव्हलपर्स आणि सेल्स-मार्केटिंगमध्ये नोकरीच्या भरपूर संधी निर्माण होत आहेत. उत्पादनक्षमतेवर नकारात्मक परिणाम होत नसल्याने हे आशादायी चित्र दिसत आहे. उद्योगपती रॉनी स्क्रूवाला म्हणाले. 'बहुतांश कपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करायला सांगितले आहे. यामुळे उत्पादनक्षमतेवर परिणार होणार नाही असे त्यांना वाटते. यामुळे भविष्यातही अशा प्रकारची कामाची पद्धत रुढ होण्याकडे कंपन्यांची वाटचाल सुरू होऊ शकते.' ई कॉमर्स कंपन्या, BSFI (Banking, financial services and insurance) या क्षेत्रात १५ टक्के जागा आहेत. बिग बास्केट आणि ग्रोफर्स या कंपन्या ग्राहकांच्या वाढत्या मागणीमुळे सुमारे १५ हजारांवर कर्मचारी भरती करत आहेत. म्हणजेच लोकांपर्यंत वस्तू आणि सेवा पोहोचवणाऱ्या या कंपन्यांकडे या आर्थिक मंदीतही सकारात्मक चित्र दिसत आहे. येत्या काळात ऑनलाइन खरेदीकडे लोकांचा ओघ अधिक असणार आहे. लॉकडाऊन संपल्यावरही लोक खबरदारी म्हणून सोशल डिस्टन्सिंग पाळतील आणि ऑनलाइन खरेदी करतील. परिणामी या क्षेत्रात मंदी नव्हे तर नोकऱ्यांची चांदी असेल, असे म्हणता येईल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3eR2Q68
via IFTTT

Post a Comment

0 Comments