पीजी मेडिकलच्या पहिल्या यादीला मनाई कायम

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई पदव्युत्तर मेडिकल अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ५ जानेवारी रोजी झालेल्या नीट परीक्षेच्या निकालाप्रमाणे राज्यातील पात्र उमेदवारांची पहिली निवड यादी प्रसिद्ध करण्यास दिलेला मनाई आदेश मुंबई उच्च न्यायालयाने ५ मेपर्यंत कायम ठेवला आहे. डॉ. राजदीप देशमुख व डॉ. अभिनव भुते यांनी अॅड. माधव थोरात यांच्यामार्फत तातडीची याचिका केल्यानंतर न्या. शाहरुख काथावाला यांनी २३ एप्रिल रोजी पहिली निवड यादी प्रसिद्ध करण्यास अंतरिम मनाई आदेश दिला होता. सोमवारी हा विषय न्या. उज्जल भुयान यांच्यासमोर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीस आला. तेव्हा दोन्ही याचिकांच्या उत्तरादाखल सरकारचे प्रतिज्ञापत्र तयार असून ते ३० एप्रिल रोजी अधिकृतरीत्या दाखल करू, अशी माहिती सरकारी वकील रीना साळुंखे यांनी सांगितले. त्यामुळे न्यायमूर्तींनी ५ मेपर्यंत अंतरिम आदेश कायम ठेवून सुनावणी तहकूब केली. डॉ. राजदीप यांनी २०१३मध्ये त्यांच्या अपंगत्वामुळे त्या कोट्यात एमबीबीएस प्रवेशासाठी प्रयत्न केला असता, त्यांना अपात्र ठरवण्यात आले होते. कारण मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या नियमांप्रमाणे शरीराच्या वरील भागातील अपंगत्व असल्यास उमेदवाराला पात्र धरता येत नाही. त्यामुळे राजदीप यांनी त्यावेळी त्याला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यावेळी न्यायालयाने जे. जे. रुग्णालयाच्या विशेष मेडिकल बोर्डकडून देशमुख यांच्याविषयी वैद्यकीय अहवाल देण्यास सांगितले. त्या अहवालानंतर न्यायालयाने त्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र ठरवले. मात्र, आता देशमुख यांनी पदव्युत्तर मेडिकल प्रवेशासाठी पुन्हा प्रयत्न केला असता, जे. जे. रुग्णालयाच्या मेडिकल बोर्डाने पदव्युत्तर शिक्षण घेण्याविषयी अपात्र ठरवले. त्यामुळे त्यांनी पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तर डॉ. भुते यांनी 'नीट'मधील गुणांव्यतिरिक्त त्यांच्या ग्रामीण भागातील वैद्यकीय सेवेविषयीचे अतिरिक्त गुण विचारात घेतले जात नसल्याने निवडप्रक्रियेला आव्हान दिले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2W10J7f
via IFTTT

Post a Comment

0 Comments