जुलैमध्ये लागणार दहावी-बारावीचे निकाल; 'कधी' ते वाचा

Maharashtra Board results 2020: राज्यातील दहावी आणि बारावीचा निकाल कधी या प्रश्नाने विद्यार्थी-पालकांना ग्रासलं होतं. गेले काही दिवस निकालाच्या तारखेची प्रतीक्षा होती. पण आता ही प्रतीक्षा संपली आहे. बारावीचा निकाल जुलैच्या मध्यापर्यंत तर दहावीचा निकाल जुलैअखेरपर्यंत जाहीर होणार आहे. स्वत: शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली. वर्षा गायकवाड यांनी आज १६ जून रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्या म्हणाल्या, 'लॉकडाऊनमुळे पेपरतपासणीचं काम सुरु व्हायला मे महिना उजाडला. आम्ही मूल्यांकन प्रक्रिया वेगात पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. बारावीचा निकाल जुलैच्या मध्यापर्यंत तर दहावीचा निकाल जुलै अखेरपर्यंत जाहीर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर एफवायजेसी प्रवेश प्रक्रिया ऑगस्टमध्ये पूर्ण होईल आणि त्यानंतर अकरावीचं वर्ष सुरू होईल.' बारावीला यंदा सुमारे १३ लाख तर दहावीला सुमारे १७ लाख विद्यार्थी बसले होते. लॉकडाऊनमुळे बोर्डाला दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द करावा लागला होता. त्याचे गुण विद्यार्थ्यांना सरासरी पद्धतीने दिले जाणार आहेत. दरम्यान, मागील वर्षी बारावीचा निकाल २८ मे तर दहावीचा निकाल ८ जून रोजी जाहीर झाला होता. अफवा पसवरू नका दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या निकालाबाबत सोशल मीडियावर अफवा पसरत आहेत. महाराष्ट्रातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनाही आपल्या निकालाची चिंता आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील दहावी आणि बारावीच्या निकालाच्या चुकीच्या तारखा व्हॉट्सअॅपसह सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र निकालाच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत, त्यामुळे या तारखांवरील अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष डॉ. शकुंतला काळे यांनी केलं होतं.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2zzWFn4
via IFTTT

Post a Comment

0 Comments