अंतिम वर्ष परीक्षा: विद्यार्थी संघटनेची उच्च न्यायालयात धाव

Final Year : महाराष्ट्रातील विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालयांमधील अंतिम सत्र परीक्षांबाबतच्या अनिश्चिततेमुळे विद्यार्थी नैराश्याच्या गर्तेत आहेत. त्यामुळे मुंबई हायकोर्टाने या प्रकरणी स्यू मोटो याचिका दाखल करत सुनावणी घ्यावी, अशी मागणी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनने (MASU) केली आहे. महाराष्ट्र विद्यार्थी संघटनेने मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींना सहा पानी पत्र ईमेल केलं आहे. या संघटनेटी स्थापना गेल्या वर्षी विशाल इंगळे या वकीलांनी केली. न्यायालयाने विद्यापीठांच्या अंतिम सत्र परीक्षांबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने (MUHS) देखील अंतिम वर्ष परीक्षांबाबत एक सामायिक निर्णय आल्यानंतरच परीक्षा घ्याव्यात, अशीही या संघटनेची मागणी आहे. 'जर अंतिम वर्ष परीक्षा घेण्याचा निर्णय झालाच तर काही गोष्टींची हमी विद्यार्थ्यांना मिळायला हवी. उदाहरणार्थ, विद्यार्थ्यांनी कोविडग्रस्त असल्याने परीक्षा देता आली नाही किंवा ते कंटेन्मेंट झोनमध्ये असल्याने परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचता आले नाही किंवा वाहतूक व्यवस्थेच्या तुटवड्यामुळे त्यांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचता आले नाही तर त्यांना जेव्हा शक्य होईल तेव्हा परीक्षा देण्याची संधी द्यायला हवी,' असं या पत्रात म्हटलं आहे. महाराष्ट्रात विद्यापीठांच्या अंतिम वर्ष परीक्षा होणार नाहीत, ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची आहे त्यांना करोना स्थिती सामान्य झाल्यावर परीक्षा देता येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. मात्र याबाबत कोणताही लेखी शासन आदेश जारी करण्यात आलेला नाही. दुसरीकडे विद्यापीठांचे कुलपती आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. विरोधी पक्षाचीही परीक्षा झाल्या पाहिजेत अशी भूमिका आहे, त्यामुळे राज्यात विद्यार्थी या परीक्षांच्या पेचामुळे हवालदिल झाले आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3fB2vUJ
via IFTTT

Post a Comment

0 Comments