Also visit www.atgnews.com
पदवी परीक्षा: प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे
मुंबई: राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या आणि संलग्न महाविद्यालयांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षांचा पेच अद्याप पूर्ण सुटलेला नाही. असे असले तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अद्यापही या परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. यासंदर्भात गुरुवारी उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाची बैठक झाली. या बैठकीस उद्धव ठाकरे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि राज्याचे महाधिवक्ता उपस्थित होते. वैद्यकीय, विधी, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, आर्किटेक्चर हे अभ्यासक्रम वगळता अन्य पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा न घेण्याचे या बैठकीत ठरल्याचे समजते. हा प्रस्ताव आता अंतिम मंजुरीसाठी राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे पाठवण्यात आला आहे. गुरुवारी झालेल्या या बैठकीत अव्यावसायिक अभ्यासक्रम अर्थात पारंपरिक बीए, बीकॉम आणि बीएससी पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय झाल्याचे सूत्रांकडून समजते. याचबरोबर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांचा निर्णय संबंधित अभ्यासक्रमाच्या परिषद ज्याप्रमाणे सांगतील, त्याप्रमाणे घेण्यात यावा, असेही ठरल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्यात सध्या आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असल्यामुळे या निर्णयाचा प्रस्ताव राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे पाठविण्यात आला आहे. या विभागाकडून याबाबतचे अध्यादेश जारी होतील, असेही सूत्रांनी सांगितले. पदवी परीक्षा न घेण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांच्यात एकमत असले तरी काही विद्यापीठांच्या कुलगुरूंचा परीक्षा न घेण्यास विरोध आहे. त्यातच विद्यापीठांचे कुलपती आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी परीक्षा न घेण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतल्याबाबत आक्षेप घेतला होता. राज्याचा प्रमुख विरोधी पक्ष भाजपचाही परीक्षा रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध आहे. परिणामी या निर्णयाच्या कायदेशीर बाबी अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतल्या जात आहेत. परीक्षा रद्द करण्याचे ठरवले तरी विद्यार्थ्यांना श्रेणी सुधारण्यासाठी परीक्षा देण्याची संधी देण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. मात्र, अद्याप अंतिम निर्णय आदेशाच्या स्वरुपात जाहीर झालेला नाही. त्यामुळे विद्यार्थी-पालकांना अद्यापही या लेखी आदेशाची प्रतीक्षा आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2CpDvlb
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments