मुख्यमंत्र्यांनी पाहिले ऑनलाईन वर्गाचे प्रात्यक्षिक

मुंबई: शालेय शैक्षणीक वर्ष सुरु झाल्यानंतर विविध ऑनलाईन माध्यमांचे पायलट प्रॉजेक्ट सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्याप्रमाणे आज त्यांनी जिओ टीव्ही तसेच गुगल मीटद्वारे कशाप्रकारे ऑनलाईन वर्ग भरवता येतो त्याचे प्रात्यक्षिक पाहिले व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. येत्या काही दिवसांत शिक्षक आमदार तसेच निवडक मुख्याध्यापक, शिक्षक यांना देखील हे सादरीकरण करून त्यांच्याकडून सुचना मागवाव्यात असेही मुख्यमंत्र्यांनी आज सांगितले. शालेय शिक्षण विभागाची व्हिसी आज त्यांनी घेतली त्यावेळी विभागाच्या मंत्री वर्षा गायकवाड देखील उपस्थित होत्या. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पहिली ते बारावी पर्यंतचा शैक्षणिक अभ्यासक्रम हा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने असल्याने त्याची सर्व उपकरणांवर कॉम्पॅटिबिलिटी असावी तसेच तो सहजरीत्या ऑफलाईन देखील उपलब्ध झाला पाहिजे हे पाहण्यास सांगितले. यावेळी त्यांनी गुगल मीट वरील एक ऑनलाईन वर्गाचे देखील प्रात्यक्षिक पाहिले. विद्यार्थ्यांना कुठल्याही तांत्रिक अडचणी येऊ देता कामा नये तसेच त्या आल्यास त्यांचे त्वरित निराकरण करणारी यंत्रणा हवी असेही ते म्हणाले. जिओ टीव्ही वर प्रायोगिक तत्वावर दहावी आणि बारावीसाठी दोन वाहिन्या तयार करण्यात आल्या आहेत. तसेच या टीव्ही वर पहिली ते बारावी असे स्वतंत्र ५ वाहिन्यांचे सुधा नियोजन आहे असे सांगण्यात आले. दूरदर्शनकडे देखील दिवसाला ४ ते ५ तास शैक्षणिक तास आयोजित करण्याचे नियोजन आहे असे यावेळी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. १०, १२ वी निकालाची प्रक्रिया वेगाने सुरु यावेळी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी सांगितले की, यंदा मार्च २० च्या दहावी परीक्षेसाठी १७ लाख ६५ हजार ८९८ आणि बारावीसाठी १५ लाख ५ हजार २७ विद्यार्थी बसले होते. बारावीचे सर्व पेपर्स कोरोनामुळे लॉकडाऊनपूर्वी संपले होते मात्र दहावीचा केवळ भूगोलाचा पेपर होऊ शकला नव्हता. मात्र आता निकाल लावण्यासाठी वेगाने प्रक्रिया सुरु असून जुलै १५ पर्यंत बारावीचा आणि जुलै अखेरीपर्यंत दहावीचा निकाल लावूत असे सांगितले. ९७ टक्के उत्तरपत्रिका या कोरोना काळात परीक्षकांकडून जमा करण्यात आल्या असून स्कॅनिंग ही वेगाने सुरु आहे. अशी माहिती दिली. '११ वी प्रवेश प्रक्रिया व्यवस्थित राबवा' दहावीच्या निकालानंतर सुमारे दीड महिना अकरावीची प्रवेश प्रक्रिया चालेल. या वर्षापासून ऑनलाईन पोर्टलमध्येही आवश्यक ते बदल करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शुल्क भरणे, डिजिटल पुस्तिका, मोबाईल एप अशा सुविधा देण्यात येत आहेत. १ जुलैपासून महाविद्यालयांचे नोंदणी सत्र सुरु होईल अशी माहिती यावेळी विभागाने दिली. मुंबई , पुणे, नागपूर, औरंगाबाद, अमरावती , नाशिक या विभागांमध्ये ही प्रक्रिया ऑनलाईन चालणार असून इतरत्र व ग्रामीण भागात ऑफलाईन प्रक्रिया चालेल. या प्रक्रिया व्यवस्थित चालतील असे पाहण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2BuOUzD
via IFTTT

Post a Comment

0 Comments