सीए परीक्षा: ऑप्ट आऊटसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

नवी दिल्ली: देशातील कोविड - १९ स्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने चार्टर्ड अकांउंटन्ट अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकांउटंट ऑफ इंडिया (ICAI) ला सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत की जे उमेदवार यावेळी सीए परीक्षा देऊ शकणार नाहीत, त्यांना ऑप्ट आऊट चा पर्याय द्यावा. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ऑप्ट आउटचा पर्याय निवडला असो वा नसो, तरीही सीए परीक्षा न देता आलेले विद्यार्थी ऑप्ट आऊट मानले जाणार आहेत. एखाद्या विद्यार्थ्याने ऑप्ट आउटचा पर्याय निवडला नसेल आणि अचानक तो राहत असलेल्या भाग कंटेन्टमेंट झोनमध्ये समाविष्ट झाला तर तो परीक्षा देऊ शकणार नाही. अशा स्थितीत ही ऑप्ट आउट केस मानली जाईल, असं कोर्टाने सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाने आयसीएआयला निर्देश दिले आहेत की परीक्षांआधी आपल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये योग्य ते बदल करून नव्या गाइडलाइन्स जारी कराव्यात. इंडिया वाइड पेरेंट्स असोसिएशनने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ऑप्ट आउट स्कीम रद्द करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली होती. यासंदर्भातील पुढील सुनावणी २ जुलै २०२० रोजी होणार आहे. नेमकं काय आहे प्रकरण? इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकांउटंट ऑफ इंडिया (ICAI) तर्फे आयोजित करण्यात येणारी मे सत्र परीक्षा २९ जुलै ते १६ ऑगस्ट २०२० या कालावधीत होणार होती. या परीक्षेसाठी आयसीएआयने ऑप्ट आऊटचा पर्याय विद्यार्थ्यांना दिला होता. हा पर्याय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका इंडिया वाइड पेरेंट्स असोसिएशनतर्फे अलख आलोक श्रीवास्तव यांनी दाखल केली होती. जुलै महिन्यात होणाऱ्या या परीक्षेसाठी ऑप्ट आऊटचा पर्याय रद्द करावा, अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे. परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ करावी, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. किमान प्रत्येक जिल्ह्यात एक केंद्र ठेवावे, अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे. जुलै महिन्यात होणाऱ्या या परीक्षेसाठी देशभरात २५९ परीक्षा केंद्रे आहेत, तर ४.६७ लाख विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2BP7YJ3
via IFTTT

Post a Comment

0 Comments