CBSE, ICSE १० वी, १२वीच्या परीक्षांचा निकाल १५ जुलै पर्यंत

नवी दिल्ली: सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या दहावी, बारावी परीक्षा रद्द करण्याच्या प्रस्तावाला सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी मान्यता दिली. यानुसार, दोन्ही बोर्डांच्या जुलैमधील परीक्षा होणार नाहीत. परीक्षा न घेताच, योग्य मूल्यांकन पद्धतीने १५ जुलैपर्यंत निकाल जाहीर करण्याला सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदिल दाखवला. न्या. ए. एम. खानविलकर यांनी बोर्डाच्या मूल्यांकन योजनेवर समाधान व्यक्त केले आणि त्यांना परीक्षेसंदर्भातील अधिसूचना काढण्याची परवानगी दिली. सीबीएसई बोर्डाची बाजू मांडणारे वकील महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की बोर्डाचा निर्णय हा विद्यार्थ्यांच्या बाजूने आहे. विद्यार्थ्यांवर ठराविक कालावधीत परीक्षा देण्याबाबत कोणताही दबाव आणला जाणार नाही. परीक्षा देण्याचा पर्याय विद्यार्थ्यांवर सोडण्यात आला आहे. बोर्ड जेव्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेईल, तेव्हा विद्यार्थ्यांनी त्यांना परीक्षा द्यायची वा नाही ते ठरवायचे आहे. दरम्यान, आयसीएसई बोर्डच्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना पूर्वपरीक्षा व अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे पर्यायी मूल्यांकन करण्याची पद्धत आठवड्याभरात वेबसाईटवर प्रसिद्ध करू, अशी हमी आयसीएसई बोर्डाने सर्वोच्च न्यायालयात दिली. ही पद्धत बहुतांश सीबीएसई बोर्डने ठरवलेल्या पद्धतीप्रमाणेच असेल, अशीही माहिती आयसीएसई बोर्डच्या वकिलांनी दिली. सीबीएसई बोर्डप्रमाणेच परीक्षा रद्द करून इच्छुक विद्यार्थ्यांना तो पर्याय नंतर उपलब्ध करण्याचा आणि परीक्षेस इच्छुक नसणाऱ्या विद्यार्थ्यांना पर्यायी गुण पद्धत स्वीकारण्याचा पर्याय देणाऱ्या निर्णयाची अधिसूचना आयसीएसई बोर्डने आज सर्वोच्च न्यायालयात सादर केली. दोन्ही बोर्डांनी परीक्षांचे निकाल १५ जुलैपर्यंत जाहीर करणार असल्याचे न्यायालयाला सांगितले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Z6JmTY
via IFTTT

Post a Comment

0 Comments