MHT-CET: ६० हजार विद्यार्थ्यांनी बदलले परीक्षा केंद्र

MHT-CET 2020: करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर अनेक परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या घराजवळचे परीक्षा केंद्र निवडण्याची मुभा दिली जात आहे. राज्याच्या सीईटी परीक्षेसाठीदेखील अशी मुभा देण्यात आली होती. एमएच-सीईटी या परीक्षेला तब्बल ५९,८७३ विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रात बदल केला आहे. ही परीक्षा जुलैअखेर आणि ऑगस्टच्या सुरुवातीच्या कालावधीत होणार आहे. राज्यातल्या अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र आणि कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी परीक्षा घेण्यात येते. यंदा सुमारे पाच लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. 'पुणे आणि मुंबई येथे कोचिंगसाठी आलेले एनेक विद्यार्थी लॉकडाऊनमध्ये आपापल्या मूळ गावी गेले. अशा विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रांमध्ये बदल केला आहे,' अशी माहिती राज्य सीईटी कक्षाचे आयुक्त संदीप कदम यांनी दिली. 'विद्यार्थ्यांसाठी आम्ही हे पाऊल उचलले होते. जे घरी परतले त्या विद्यार्थ्यांना या निर्णयाचा खूपच फायदा झाला आहे. सुमारे ६० हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रात बदल केला. पाच लाख विद्यार्थांनी नोंदणी केली आहे, त्या तुलनेत ६० हजार ही मोठी संख्या आहे. ११ टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्र बदलून घेतले आहे,' असं कदम म्हणाले. ही परीक्षा मूळ नियोजनानुसार १३ ते २३ एप्रिल २०२० या कालावधीत होणार होती. मात्र करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. आता नव्या वेळापत्रकानुसार जुलै ४, ६, ७, ८, ९, १०, १३, १४, २८, २९, ३० आणि ३१ या तारखांना परीक्षा घेण्यात येणार आहे. ३ ते ५ ऑगस्टला पुन्हा राहिलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार आहेत. एकूण ४ लाख १३ हजार २८४ विद्यार्थ्यांची आधी नोंदणी झाली होती. अतिरिक्त नोंदणी झाली ती संख्या धरून ५ लाख २४ हजार ९०७ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा आता जिल्हा पातळीऐवजी तालुकास्तरावर घेण्यात येणार आहे. त्यादृष्टीने तयारी करून त्यानुसार विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलण्याची संधी देण्यात आली होती. परीक्षेचे हॉलतिकिट किंवा प्रवेशपत्र देखील तयार असून लवकरच ते विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येतील असेही कदम यांनी सांगितले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ekkiz4
via IFTTT

Post a Comment

0 Comments