UPSC नागरी सेवा पूर्व परीक्षा उमेदवारांना परीक्षा केंद्र बदलता येणार

Exam 2020: यूनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजेच यूपीएससीने उमेदवारांना मोठा दिलासा दिला आहे. ४ ऑक्टोबर २०२० रोजी होणाऱ्या नागरी सेवा पूर्व परीक्षएसाठी उमेदवारांना आता परीक्षा केंद्र बदलता येणार आहे. ४ ऑक्टोबर रोजी नागरी वन सेवा पूर्व परीक्षेसह अन्य सेवांसाठी परीक्षा होत आहे. उमेदवारांनी मोठ्या प्रमाणावर परीक्षा केंद्र बदलण्याची मागणी केली होती. ती लक्षात घेऊन उमेदवारांनी परीक्षा केंद्र बदलण्याची संधी देण्यात येत आहे, असे आयोगाने बुधवारी जारी केलेल्या जाहीर निवेदनात म्हटले आहे. याव्यतिरिक्त केंद्रीय नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२० आणि भारतीय वन सेवा मुख्य परीक्षा २०२० या परीक्षांसाठीदेखील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलता येणार आहे, असं निवेदनात म्हटलं आहे. दोन टप्प्यांमध्ये उमेदवारांना परीक्षा केंद्र बदलण्याची प्रक्रिया करता येणार आहे. पहिल्या टप्प्यात ७ जुलै ते १३ जुलै २०२० (सायंकाळी ६ वाजेपर्यंत) आणि दुसऱ्या टप्प्यात २० ते २४ जुलै २०२० (सायंकाळी ६ वाजेपर्यंत) आयोगाच्या संकेतस्थळावर जाऊन हा परीक्षा केंद्राचा पर्याय बदलता येणार आहे. उमेदवारांनी हेही लक्षात घ्यावं की एकदा परीक्षा केंद्राचा पर्याय बदलला की तो पर्याय गोठवण्यात येणार आहे (लॉक होणार आहे). उमेदवारांना एकदा बदललेलं परीक्षा केंद्र पुन्हा बदलता येणार नाही. ही नागरी सेवा पूर्व परीक्षा आधी ३१ मे रोजी होणार होती, पण करोना महामारी संकटामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. ही परीक्षा आता ४ ऑक्टोबर २०२० रोजी होणार आहे. 'विथड्रॉवल विंडो' यूपीएससीने उमेदवारांना एक 'विथड्रॉवल विंडो' सुद्धा उघडून दिली जाणार आहे. यानुसार, १ ते ८ ऑगस्ट २०२० या कालावधीत उमेदवारांना त्यांचे अर्ज मागे घेण्याची मुभा देखील दिली जाणार आहे. एकदा अर्ज मागे घेतला की मात्र तो पुन्हा दाखल होऊ शकणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी, असंही या निवेदनात म्हटलं आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2NJxMJ0
via IFTTT

Post a Comment

0 Comments