पुण्याच्या मेकॅनिकल इंजिनीअर आशुतोषने नोकरी सांभाळून क्रॅक केली यूपीएससी

पुणे: प्रत्येक वेळी यश चकवा दाखवून निघून गेलं... अखेर चौथ्या प्रयत्नात यूपीएससी क्रॅक करता आली...पुण्याच्या मेकॅनिकल इंजिनीअर असलेल्या याला म्हणूनच ही यशाची प्रक्रिया खूपच लांबलचक वाटली..पण अर्थात तीन मुलाखतींनंतर अखेर आयएएस होण्याचं स्वप्न पूर्ण झालं आणि खूप आनंद झाला, असं तो म्हणाला. केंद्रीय नागरी सेवा मुख्य परीक्षा २०१९ चा निकाल मंगळवारी ४ ऑगस्ट रोजी जाहीर झाला. यात पुण्याच्या आशुतोष कुलकर्णीने ४४ वा रँक पटकावला आहे. महाराष्ट्र टाइम्सचे पुणे प्रतिनिधी हर्ष दुधे यांनी आशुतोष कुलकर्णीशी संवाद साधला. आयएएसचं स्वप्न साकार झाल्यावर कसं वाटतंय असं विचारता आशुतोष म्हणाला, 'खूप आनंद झाला आहे. समाधान मिळवण्याचा एक मार्ग असं मी आयएएसकडे पाहतो. आपल्यामुळे इतर चार लोकांच्या आयुष्यात सकारात्मक फरक पडला तर एक वेगळंच समाधान मिळतं.' आशुतोषनं दिल्लीतून या परीक्षेची तयारी केली, कारण तो तिथे नोकरी करत होता. माय गव्हर्नमेंट नावाच्या संस्थेत त्याने गेली दीड वर्षं नोकरी केली. सोशल मिडीया मार्केटिंगचा हा जॉब होता. आशुतोष हा मेकॅनिकल इंजिनीअर आहे. त्याने पीव्हीसीमधून मेकॅनिकल इंजिनीअरींगची पदवी घेतली. चाणक्य मंडळ आणि ज्ञानप्रबोधिनीतून यूपीएससीसाठी मार्गदर्शन मिळाल्याचं त्याने सांगितलं. 'नोकरी करता करता दिवसातून पाच ते सहा तास अभ्यास करत होतो. मेन्सच्या आधी एक महिनाभर नोकरीतून रजा घेऊन पूर्णवेळ अभ्यास केला. आधीची तयारी कामी आलीच होती. त्यामुळे नोकरी सांभाळून अभ्यास करता आला,' असं आशुतोषने सांगितलं. त्याचं शालेय शिक्षण मुक्तांगणमध्ये झालं. एसपी कॉलेजमधून अकरावी, बारावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. वडील चंद्रशेखर कुलकर्णी सीडॅक संस्थेत इंजिनीअर आहेत तर आई निवृत्त बँक मॅनेजर आहे. मोठी बहीण अमेरिकेत असते. 'घरात आयएएसची कोणतीही पार्श्वभूमी नव्हती. पण माझं हे स्वप्न होतं, आणि अखेर ते पूर्ण झालं याचा खूप आनंद आहे,' असं आशुतोष म्हणाला.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3fuKsyW
via IFTTT

Post a Comment

0 Comments