विधी अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा CLAT 2020 पुन्हा लांबणीवर

Postponed: विधी अभ्यासक्रमांसाठी होणारी प्रवेश परीक्षा अर्थात CLAT 2020 पुन्हा लांबणीवर पडली आहे. ही परीक्षा ७ सप्टेंबर रोजी होणार होती, मात्र आता ती २८ सप्टेंबर २०२० रोजी घेण्यात येईल, असे कन्सोर्टियम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीजने कळवले आहे. पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अशा दोन्ही उमेदवारांनासाठी २८ सप्टेंबर २०२० रोजी परीक्षा होणार आहे. क्लॅट परीक्षेचे निमंत्रक प्रा. बलराज चौहान यांनी शुक्रवारी यासंदर्भातील परिपत्रक जारी केले. यात असे म्हटले आहे की 'यूजी आणि पीजी अशा दोन्ही उमेदवारांसाठी ७ सप्टेंबर २०२० रोजी होणारी CLAT 2020 परीक्षा आता सोमवार, २८ सप्टेंबर २०२० रोजी दुपारी २ ते सायंकाळी ४ या वेळेत होईल.' ही परीक्षा संगणकीकृत असणार आहे. कन्सोर्टियम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीजच्या कार्यकारी समितीची गुरुवारी २७ ऑगस्ट रोजी बैठक झाली. कोविड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक घेण्यात आली होती. देशातील विविध राज्यातील करोना स्थिती अजूनही गंभीर असल्याने ही परीक्षा तूर्त पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. अनेक राज्यातील लॉकडाऊन स्थितीची मुदत आणखी वाढवण्यात आली आहे. प. बंगालमधील लॉकडाऊन ७ सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आला आहे. बिहारमधील लॉकडाऊनमध्ये ६ सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर क्लॅट परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2EEJO5t
via IFTTT

Post a Comment

0 Comments