दहावी, बारावीच्या ऑक्टोबर फेरपरीक्षा लांबणीवर

SSC HSC Re-Exam 2020: राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या श्रेणीसुधार तसेच पुनर्परीक्षा ऑक्टोबरमध्ये होणार नाहीत. राज्यातील कोविड - १९ स्थिती पाहता या परीक्षा आता दिवाळीनंतरच होणार आहेत. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. राज्य मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या शैक्षणिक वर्ष २०१९-२० च्या पुनर्परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली. 'या परीक्षा सर्वसाधारण स्थितीत ऑक्टोबर महिन्यात घेतल्या जातात. परंतु यंदा राज्यावर करोनाचं सावट असल्याने या परीक्षा नोव्हेंबर किंवा कदाचित डिसेंबरपर्यंतही लांबणीवर पडतील,' असं त्या म्हणाल्या. दरम्यान, दरवर्षी दहावी आणि बारावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना तत्काळ फेरपरीक्षा देऊन उत्तीर्ण होण्याची संधी दिली गेल्या काही वर्षांपासून मिळत होते. माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी हा निर्णय घेतला होता. यानुसार दहावी, बारावीचा निकाल साधारणपणे मे महिन्यात जाहीर झाल्यानंतर तत्काळ जुलै-ऑगस्टमध्ये फेरपरीक्षा घेतली जात होती, जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जात नव्हते. पण यंदा परीक्षांचे निकालच मुळात जुलै मध्ये लागल्याने या फेरपरीक्षाही झाल्या नाहीत. यामुळे अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष वाचवण्याची संधी मिळालेली नाही. कोविड-१९ संसर्ग स्थितीमुळे यंदा दहावी-बारावीच्या मूल्यांकन प्रक्रियेस आणि पर्यायाने निकालास विलंब झाला. लॉकडाऊनमुळे दहावीची भूगोल विषयाची परीक्षा देखील रद्द करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना या विषयाचे सरासरी गुण देण्यात आले. कोविड-१९ संसर्गग्रस्त रुग्णांची संख्या अद्यापही कमी झालेली नाही. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांना करोना संसर्गाचा फटका बसला आहे. या सगळ्याचा परिणाम परीक्षांवर होत आहे. करोनामुळे अनेक शाळांच्या इमारतींचे रुपांतर क्वारंटाइन सेंटरमध्ये करण्यात आले आहे. परिणामी तूर्त तरी कोणत्याही परीक्षा घेण्याची राज्य सरकारची मानसिकता नाही. याचाच परिणाम म्हणून दहावी, बारावी फेरपरीक्षा लांबणीवर पडल्या आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/32Ov5gr
via IFTTT

Post a Comment

0 Comments