नागपूर विद्यापीठाच्या पदवी परीक्षा स्थगित; कर्मचारी आंदोलनामुळे निर्णय

Exam Postponed: राज्यातील अकृषी विद्यापीठे आणि महाविद्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या लेखणीबंद आंदोलनामुळे पदवी आणि पदव्युत्तरच्या अंतिम वर्षाच्या १ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज , संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने याबाबतचा निर्णय जाहीर केला आहे. करोनाकाळात अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत सुरुवातीपासून कमालीचा गोंधळ सुरू आहे. परीक्षा नकोच अशी भूमिका घेणाऱ्या राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे या परीक्षेची तयारी सुरू करावी लागली. परीक्षा बव्हंशी ऑनलाइन घेण्याचे ठरले. ती तयारी अंतिम टप्प्यात आली असतानाच विद्यापीठ तसेच महाविद्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले. यामुळे परीक्षेची तयारी प्रभावित झाली. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. मात्र यातून तोडगा निघाला नाही. गेल्या दोन वर्षांपासून केवळ आश्वासने मिळत आहेत. अध्यादेश निघत नाही तोवर काम नाही, अशी कर्मचाऱ्यांनी ठाम भूमिका घेतली आहे. कुलगुरूंनी स्थानिक पातळीवरही परीक्षा सुरळीत पार पाडण्याबाबत प्रयत्न केले. या प्रयत्नांनाही यश आले नाही. संपामुळे परीक्षेचे महत्त्वपूर्ण काम आधीच पाच दिवसांपासून रखडून आहे. त्यामुळे तूर्त परीक्षा घेणे अशक्य असल्याचे अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी सांगितले. 'परीक्षेच्या पुढील तारखेबद्दल अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही', असे नागपूर विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी सांगितले. मुंबई, गडचिरोली विद्यापीठ ठाम गोंडवाना विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा ५ ऑक्टोबरपासून आहेत. परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय सध्या झालेला नाही. आम्ही ठरल्यानुसार परीक्षा घेण्यावर ठाम आहोत, असे कुलसचिव ईश्वर मोहुर्ले यांनी सांगितले. तर, 'मुंबई विद्यापीठाअंतर्गत होणाऱ्या परीक्षा या कॉलेज स्तरावर होत असल्याने अधिकारी व कर्मचारी यांच्या आंदोलनाचा त्यावर फरक पडणार नाही. या सर्व परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार होतील', असे विद्यापीठ प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र लेखणीबंद आंदोलन सुरूच राहिले तर निकाल रखडण्याची चिन्हे आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3cGLN5Y
via IFTTT

Post a Comment

0 Comments